कोरोना ग्रामीण भागात धुमाकूळ घालत आहे. एका बाजूला महसूल व पोलीस यंत्रणा जीवाचे रान करीत आहे तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्तरावर महत्त्वाचा घटक असलेले ग्रामसेवक आडमुठेपणाचे धोरण राबवित गावातील लोकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे चित्र दिंडोरी तालुक्यात दिसत आहे. यासंदर्भात कावळे यांच्या माहितीनुसार, बोपेगाव येथे गाव पातळीवर कोरोना बाधित रुग्णाचा सर्व्हे करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कर्मचारी यांनी ग्रामसेवक के. जे. शिरोरे यांची भेट घेऊन ऑक्सिमीटर, थर्मल गन व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. मात्र, ग्रामसेवकांनी सरपंच, उपसरपंच यांच्यासोबत चर्चा न करता परस्पर यासंदर्भात ग्रामपंचायत काहीही उपलब्ध करून देऊ शकत नाही असे सांगून त्यांची बोळवण केली. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर व गटविकास अधिकारी भावसार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
इन्फो
ग्रामसेवकांचे शहरात वास्तव्य
आवश्यक साहित्य ऑक्सिमीटर, थर्मल गन, सॅनिटायझर आदी साहित्य खरेदी करून देण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाची असताना काही ग्रामसेवक या कामी हात झटकत आहेत. शिवाय अनेक ग्रामसेवक नाशिक शहरात वास्तव्यास असल्यामुळे ते आठवड्यातून एखाद्या दिवशी गावात उपस्थित राहत असून पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील संघटनेच्या दबावामुळे अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे.