गोकुळ सोनवणे सातपूरमहानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्र मांक ८ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्यात सरळसरळ लढत होत आहे. या प्रभागात विद्यमान नगरसेवक विलास शिंदे यांचे प्राबल्य असून त्यांना शह देण्यासाठी भाजपा, काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांनी कंबर कसली आहे. याच प्रभागात आजी- माजी महिला नगरसेवक एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.नवीन प्रभाग रचनेनुसार या प्रभागात नरसिंहनगर, शंकरनगर,सद्गुरूनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, संतकबीरनगर, सावरकरनगर, आनंदवली, गंगापूर आदि भागांचा समावेश आहे. मागील पाच वर्षांच्या काळात शिवसेनेचे विलास शिंदे यांनी या प्रभागाचे नेतृत्व केलेले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रभावक्षेत्रात अस्तित्व टिकवावे लागणार आहे. नाही म्हटले तरी बदलत्या राजकीय समीकरणात नवख्यांचे आव्हान दुर्लक्षून चालणार नाही. पक्षानेदेखील शिंदे यांच्या मर्जीतील उमेदवार देऊन त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. असे असले तरी त्यांना अमोल पाटील यांचे आव्हान पेलावे लागणार आहे. सर्वसाधारण गटातून शिंदे यांना शह देण्यासाठी नगरसेवक दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील भाजपाकडून निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे अरुण पाटील, काँग्रेसचे कैलास कडलग, मनसेचे मनीषा साळवे, बसपाचे सचिन जाधव यांच्यासह दोन अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरी सेना-भाजपा यांच्यातील चुरस पहायला मिळू शकते. शिंदे विद्यमान नगरसेवक असल्याने त्यांच्या नावाची चर्चा अपेक्षितच आहे. परंतु त्यांना भाजपा आणि इतर अपक्षांकडून कडवे आव्हानही असणार आहे. अनुसूचित जमाती महिला गटात भाजपाकडून विद्यमान नगरसेवक रेखा बेंडकुळे, शिवसेनेकडून राधा बेंडकोळी, काँग्रेसकडून शोभा भोये, माजी नगरसेवक उषा बेंडकोळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणीदेखील भाजपा आणि शिवसेना अशीच लढत होऊ शकते. अनुसूचित जाती महिला गटात तब्बल १२ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेकडून नयना गांगुर्डे, भाजपाकडून अर्चना कोथमिरे, काँग्रेसचे सुरेखा खोब्रागडे, बसपाच्या सोनी शिंदे, मनसेच्या मोनिका वझरे यांसह रिपाइं, भारिप आणि चार अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. सर्वसाधारण गटातून शिवसेनेचे संतोष गायकवाड, भाजपाचे अशोक जाधव, काँग्रेसचे सचिन मंडलिक, मनसेचे मोतीराम बिडवे आणि दोन अपक्ष असे ६ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे सातपूर मंडळ अध्यक्ष असलेले अशोक जाधव यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश घेतला होता. तर भाजपानेदेखील जाधव यांना उमेदवारी देऊन त्यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांना शिवसेनेचे संतोष गायकवाड यांचा सामना करावा लागणार आहे.
आजी-माजी नगरसेवक आणि नवखे
By admin | Published: February 09, 2017 1:00 AM