महायुती सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा फसव्या, विजय वडेट्टीवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 06:20 PM2024-07-24T18:20:32+5:302024-07-24T18:21:42+5:30
Vijay Wadettiwar Mahayuti Government: महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नाशिक - केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. दुष्काळ, अवकाळी, गारपीट, कमी पर्जंन्य, पाणी टंचाई, पिकावरील रोग, वादळं अशी नैसर्गिक संकटं कायम उभी आहेतच. वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक या संकटांचा सामना शेतकऱ्याच्या पाचवीला पुजला असून, आता सरकार पुरस्कृत संकट उभी केली जात असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आज नाशिकच्या चांदवड येथील माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी बोलत होते. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, केंद्राची निर्यात बंदी, शेतमालाला भाव नाही, हमीभाव नाही, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक, खते, बियाणे, शेती अवजारे यांचे वाढलेले दर, महागाईचा उच्चांक, जलयुक्त शिवारचे अपयश, चारा उपलब्ध न करणे, परिणामी पशुधनाची गैरसोय, केंद्राकडून मदत न मिळणे, शेतीसाठी असणाऱ्या सामुग्रीवर भरमसाठ जीएसटी आकारणे या सरकारी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्थ झाला आहे.
महायुतीने खताच्या नावाखाली माती दिली आहे. शेतकऱ्यांना मदतीच्या फसव्या घोषणा केल्या. त्याचबरोबर राज्यात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. लाडकी बहीण सारख्या योजना सरकारने आणल्या परंतु लाडकी बहीण सुरक्षित नाही हे सरकार विसरलं आहे. अशा शब्दात श्री. वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले.