लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथे मंगळवारी दुपारपासून हरविलेल्या आजोबांसह नातवाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी गावाजवळील विहिरीत आढळून आला आहे. दुचाकी चालविताना नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन मोटार सायकलसह दोघे जण रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी अधिक तपास पोलीस करीत आहेत.पानेवाडी येथील भीमा किसन सांगळे हे मंगळवारी दुपारी तीन वाजता त्यांचा तीन वर्षांचा नातू वैभव सुनील सांगळे याला आपल्या बजाज मोटारसायकल क्रमांक एमएच ४१, ५४७२ वर शेतातून गावातील घराकडे जाण्यासाठी निघाले. सायंकाळपर्यंत ते घरी न पोहोचल्याने सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. नातेवाइकांनी रात्री उशिरा पर्यंत शोध घेऊनही दोघे न सापडल्याने मनमाड शहर पोलिसात हरविल्याची तक्र ार दाखल करण्यात आली.शोधमोहीम राबविली असता मोटारसायकल विहिरीतून काढण्यात यश मिळाले असले तरी नातू वैभव याचा शोध लागत नव्हता. अखेर मनमाड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वैभव याचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेमुळे पानेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.या दोघांच्या शोधासाठी नातेवाइकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. बुधवारी सायंकाळी नातेवाइकांना पानेवाडी येथील एका विहिरीच्या पाण्यावर आॅइलचे तवंग दिसून आल्याने संशय निर्माण झाला. त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने विहिरीत गळ सोडून शोध घेतला असता सांगळे यांचा मृतदेह अडकून वर आला.