नाशिक माझ्याकडे सध्या जवळपास अडीच हजार बाहुल्या असून, त्या सगळ्या माझ्या बाहुलाघर किंवा सध्याच्या भाषेत स्टुडिओत आहेत. मात्र, शंभर वर्षांचे झालेले अर्धवटराव, आवडाबाई, ससुल्या आणि तात्या विंचू हे माझ्या घरातील स्वतंत्र खोलीत राहतात. अर्धवटरावांना तर आमच्या घरात आजोबांसारखे स्थान आणि मान असल्याचे सांगत शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी निर्मितीपासून आतापर्यंत शंभरी पार केलेल्या बाहुल्यांबद्दलचे विशेष स्थान अधोरेखित केले.चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मुक्तसंध्या या कार्यक्रमात रामदास पाध्ये आणि अपर्णा पाध्ये यांची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. यावेळी बोलताना पाध्ये यांनी वडिलांनी निर्मिती केलेल्या अर्धवटरावांचा जीवनप्रवास आणि त्यांचा कलाप्रवास उलगडत नेला. अर्धवटराव हा बाहुला मिकी-माउसपेक्षाही १० वर्षे जुना असल्याने त्याला सर्वच स्तरावर विशेष स्थान असल्याचेही पाध्ये यांनी नमूद केले. मी वयाच्या आठव्या वर्षापासून वडिलांकडून आणिअन्य कलाकारांकडून बाहुल्यांची कला शिकत होतो. त्याबरोबरच इंजिनिअरिंगचे शिक्षणदेखील घेतले. नोकरीनिमित्त मी अमेरिकेत गेलो असतानाच तेथील शब्दभ्रमकार एडगर बर्गन हे त्याच्या चार्ली मॅकार्थी या बाहुल्यासह स्वत:च्या स्वतंत्र विमानाने आल्याचे पाहिल्यावर मी स्वत: नोकरीचा राजीनामा देऊन भारताचा शब्दभ्रमकार होण्याचा निर्णय घेतल्याचे पाध्ये यांनी नमूद केले.कार्यक्रमात पाध्ये यांच्या जीवनावरील गप्पा, अपर्णा पाध्ये यांचा पपेटरीतील सहभाग यावरदेखील दिलखुलास गप्पा रंगल्या. कार्यक्रमाच्या अखेरीस काही मिनिटे अर्धवटरावांसमवेत पाध्ये यांनी त्यांच्या अर्धवटरावांसह शो सादर करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी अर्धवटराव यांचे शंभरी पूर्ण केल्याबद्दल नाशिकच्या सुवासिनींकडून औक्षणदेखील करण्यात आले.तिकडे माझ्यासारखेच खूप बोलके बाहुलेअर्धवटराव सध्या तुम्हाला बरीच मागणी दिसते. नाही सध्या थोडीशी कमी झाली आहे. का ? का ? अहो तिकडे राजकारणात पण माझ्यासारखे बोलके बाहुले सध्या खूप झालेत आणि मुख्य म्हणजे त्यातील बरेचसे माझ्यासारखे अर्धवटराव आहेत, असा राजकारणाच्या सद्यस्थितीवरील पंच पाध्ये यांनी अर्धवटरावांच्या मुखातून वदवताच प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना दाद देण्यात आली.
अर्धवटरावांना आमच्या घरात आजोबांचे स्थान : रामदास पाध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:34 AM