नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम अशा दुगारवाडी येथील बुधा खाडम यांच्या घरात घुसून बिबट्याने रोशन खाडम या सहा वर्षे वयाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने, मुलाशेजारी बसलेल्या आजीने आरडाओरड करत बिबट्यावर प्रहार केल्याने मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. सदर मुलास नाशिकला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुलाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. मुलाची प्रकृती आता स्थिर आहे.
मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुगारवाडी येथे बुधा खाडम यांच्या उघड्या रोशन बुधा खाडम हा त्याची आजी शेवंताबाईसोबत चहा-बिस्कीट खात बसलेला होता. याच वेळी घरात अचानक बिबट्याने शिरकाव केला आणि मुलावर हल्ला करत त्याच्या मानेला धरून त्याला फरपटत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवळच बसलेली आजी शेवंताबाईने हातातील पकडीने बिबट्याच्या पार्श्वभागावर प्रहार केले व आरडाओरड सुरू केली. त्यामुळे आसपासचे ग्रामस्थ ताबडतोब मदतीसाठी धावले. त्यांनी लाठ्या-काठ्यांनी बिबट्यावर हल्ला चढवत मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. यावेळी बिबट्याने मुलाला तेथेच टाकत जंगलाकडे धूम ठोकली. बिबट्याच्या या हल्ल्यात रोशनच्या मानेला मोठ्या जखमा झाल्या, तर हात व पाठीवरही बिबट्याने जखमा केल्या. रक्तबंबाळ अवस्थेत खाडम कुटुंबासह ग्रामस्थांनी रोशनला तत्काळ त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून रोशनला १०८ रुग्णवाहिकेतून नाशिकला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.