याप्रकरणी अधिक माहिती अशी, शैलेजा प्रकाश शिंदे (७६, रा. गुरुकृपा बंगला, उपनगर) या शुक्रवार (दि. १९) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास इच्छामणी गणपती मंदिराजवळून महारुद्र कॉलनीच्या अंतर्गत रस्त्यावरून आपल्या नातीला घेऊन फेरफटका मारत होत्या. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीने आलेल्या दोघा चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेला चोर त्यांच्या गळ्यातील मोहनमाळ हिसकावून दुचाकीने फरार झाला. ही घटना लक्ष्मीपूजन अपार्टमेंटसमोर घडली. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ४० ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसकावल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
----
मंदिरातील दानपेटी लंपास
नाशिक : मंदिराच्या सभामंडपात ठेवलेली दानपेटी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना वडनेर रोड परिसरात घडली. याप्रकरणी राजेंद्र बाबुराव फल्ले (रा. विद्याविनय सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्याविनय सोसायटी परिसरात असलेल्या श्रीराम मंदिराच्या सभामंडपात भगव्या रंगाची लोखंडी व फायबरची दानपेटी ठेवलेली होती. मंगळवारी (दि.९) रात्री एक वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दानपेटी गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-------
बंगल्यातील चंदनवृक्षावर चालविली कुऱ्हाड
नाशिक : चंदनचोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा गैरफायदा घेत एका संसरी लेन परिसरातील एका बंगल्याच्या आवारात असलेल्या चंदनाच्या झाडावर कुऱ्हाड चालवून बुंधा कापून लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शैलेंद्र यज्ञकुमार राजपूत (रा. सुतारगल्ली, भगूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संसरीलाईन, रेल्वे गेटजवळ ‘मुन्सी व्हिला’ या बंगल्याच्या आवारात अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (दि. १९) रात्री प्रवेश करत चंदनवृक्ष कापले. चार हजार रुपये किमतीचे चार फूट लांबीचा चंदनाच्या झाडाचा बुंधा चोरट्यांनी हातोहात गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.