२०१८ मध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या जिल्ह्यांमध्ये शाससाने दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली होती. त्याअनुषंगाने अशा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या पश्नावर मात करण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. छावण्या उघडण्यासाठीची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. त्यानुसार नाशिक विभागीय आयुक्तांनी दि. १ सप्टेंबर २०१९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीतील दोन टप्प्यांतील चारा छावण्यासांसाठीचे देयक अदा करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने १३ कोटी २९ लाख ९३ हजार रुपये नाशिक विभागाला वितरित केले आहेत.
नाशिक विभागातील टंचाईग्रस्त भागात आवश्यकतेनुसार चारा छावण्या उघडण्यात आलेल्या होत्या. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर तसेच १ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या कालावधीतील छावण्यांचे देयके अदा करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी १३ कोटी २९ लाख ९३ हजार इतक्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने निधी विभागाला मंजूर केला आहे.
जनावरांच्या चारा छावण्यांमध्ये चारा, पाणी, औषधे यांचा पुरवठा आणि चारा वाहतुकीचा खर्च देण्यात आलेला आहे. त्यामध्ये ०.२५ टक्के प्रशासकीय खर्चासह विभागाला निधी मंजूर करण्यात आला आहे. विभागाला प्राप्त झालेला निधी हा तत्काळ जिल्ह्यांना वितरित करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले. छावणी चालकांना थेट इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस माध्यमातून तत्काळ निधी वितरित केला जाणार आहे.