सिन्नर : तालुक्यातल्या गुळवंच व आडवाडी येथे चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या आहे. त्या तत्काळ सुरू करण्याच्या सूचना तहसीलदार राहुल कोताडे यांनी छावणी संचालकांना दिल्या. छावण्या सुरू करण्याची तयारी सोमवारपासून सुरू झाली असून दोन दिवसात जनावरांना प्रवेश देण्याची तयारीही छावणी संचालकांनी केली आहे. दरम्यान, खापराळेसह आणखी दोन ठिकाणी चारा छावण्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. छावणी सुरू होताच शेतकऱ्यांनी स्वत:हून जनावरे दाखल करावीत, अशी माहिती तहसीलदारांनी दिली. गुळवंच येथील ग्रामविकास संस्था व आडवाडी येथे नंदनवैभव बचतगटाने चारा छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव दिले होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्यास मंजुरी दिल्यानंतर तहसीलदार कोताडे यांनी संबंधित संस्थांना बोलावून छावणी सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तत्पूर्वी चारा, पाणी आदी सुविधांची तयारी तत्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विविध गावांतील शेतकरी छावणीत जनावरे दाखल करू शकणार आहेत. त्यात एका छावणीत कमीत कमी ३०० तर जास्तीत जास्त तीन हजार जनावरांपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. छावणीत दाखल झालेल्या मोठ्या जनावरास रोज १८ व लहान जनावरास ९ किलो हिरवा चारा मिळू शकेल. वाळलेला चारा मोठ्या जनावरास ६ तर लहान जनावरास ३ किलो देणे बंधनकारक आहे. छावणीत दाखल झालेल्या जनावरांची रोज हजेरी घेतली जाणार असून त्यासाठी कानाला बारकोड असलेले टॅग लावणे छावणी संचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. हजेरीसाठी शौर्य टेक्नोसॉफ्ट कंपनीकडून विनामुल्य अॅप उपलब्ध करण्यात आले असून अॅपद्वारे बारकोडच्या माध्यमातून जनावरांची आॅनलाइन हजेरी करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय छावणीत सीसीटीव्ही व्यवस्था करून जनावरांचे चित्रीकरण करावे लागणार आहे. चारा डेपोद्वारे वितरणप्रसंगी जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली होती. छावणीतील जनावरांना लागणारा चारा व डेपोद्वारे जनावरांना देण्यात येणारा चारा यात आढळलेली तफावत पाहता तूर्त चारा डेपोबाबत प्रशासकीय पातळीवर कोणतीही हालचाल दिसत नाही. मात्र तालुक्यात बहुतांश गावांतील शेतकºयांना चारा डेपो हवे आहेत.
गुळवंच, आडवाडीत चारा छावण्या मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 2:15 PM