नाशिक : यावर्षी द्राक्ष निर्यातीचा वेग कमी असल्याने जिल्ह्यातील कोल्ड स्टोरेज व्यवसायालाही त्याची झळ पोहोचली असून, प्रत्येक स्टोरेजला सुमारे १० ते २० लाख रुपयाचा फटका बसला आहे. केंद्र सरकारणे द्राक्ष निर्यातीसाठी देण्यात येणारी तीन लाखाची सबसिडी बंद केली असून, कंटेनरचीही मोठ्या प्रमाणात भाडेवाढ झाली आहे.याशिवाय युरोपीय देशामध्ये असलेले लॉकडाऊन यामुळे द्राक्ष हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असला तरी अद्याप निर्यातीला वेग आलेला नाही. उत्तर भारतात असलेल्या थंडीमुळेही द्राक्ष खुडणी मर्यादित स्वरूपात सुरू आहे. द्राक्ष बागेतून खुडणी केलेल्या द्राक्षांचे तापमान १ डिग्री सेल्सिअसपर्यंत येण्यासाठी ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावे लागतात. यासाठी कोल्ड स्टोरेज चालक ४ ते ५ पाच रुपये प्रति किलोप्रमाणे दर आकारणी करतात. हा खर्च निर्यातदार करीत असतो. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील बहुसंख्य कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्राणात माल ठेवला जातो. यावर्षी मात्र निर्यातीचा वेग मंदावला असल्याने कोल्ड स्टोरेज चालकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सुमारे १२५ कोल्ड स्टोरेज आहेत. एका स्टोरेजला १० ते २० लाखाचा फटका बसल्याचे गृहित धरल्यास हा आकडा कोट्यवधीपर्यंत जातो.
द्राक्ष निर्यातीचा वेग कमी : चालक अडचणीत कोल्ड स्टोरेजला लाखोंची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:59 AM