निफाड तालुक्यात ऊस, कांदा या नगदी पिकांबरोबरच द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. दोन वर्षांपासून द्राक्ष कोरोनाच्या महामारीने पिकवता आले; पण विकता आले नाही. त्यातच व्यापाऱ्यांनी लूट भावात द्राक्ष घेतली, परंतु काहींना गंडा ही घालण्याचे प्रकार घडले. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला.
कधी विजेचा लपंडाव तर कधी बेमोसमी हवामानाचा फटका, फवारणीचा वाढलेला खर्च त्यामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा सद्याच्या बेमोसमी व अवकाळी पर्जनवृष्टीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून अगोदरच कर्जबाजारी झालेल्या बळीराजाला या पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला असून कधीही भरून न निघणारे नुकसान दरवर्षी वाढतच आहेत.
एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा खंडित होणारा वीज प्रवाह या दुहेरी संकटात सापडलेल्या दिक्षीच्या ज्ञानेश्वर तांबडे या युवक शेतकऱ्याने यंदा द्राक्ष बागा फेल गेल्याने मोठ्या कष्टाने उभी केलेली दीड एकर द्राक्षबाग कुऱ्हाडीचे घाव घालून उद्ध्वस्त केली.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्रावरून आलेली व सध्या ३-४ दिवसांच्या पावसाळी वातावरणामुळे हवेत वाढलेली आर्द्रता व उत्तर तसेच ईशान्य भारतातून असलेल्या आपल्याकडे येत असलेल्या थंड हवेचा रेटा, सूर्यप्रकाशाचा अभाव, पहाटे खाली सरकत जाणारे जमिनीचे तापमान, वाऱ्याची शांतता ह्या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे सध्या धुक्याचे अधिक प्रमाण जाणवते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने द्राक्ष पिकवले तर विकता आले नाही त्यात व्यापाऱ्यांनी फसवणुकीची भीती. यंदा बाग फेल आणि अस्मानी संकटात सापडलो कर्जाचा बोजा वाढत चालला त्यामुळे आता द्राक्ष बागच नको म्हणून उद्ध्वस्त केली.
- ज्ञानेश्वर तांबडे, शेतकरी, दिक्षी