कसबे सुकेणे: निफाड तालुक्यातील नागापूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची ११ लाख ३७ हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली असून सायखेडा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध दि. १५ रोजी रात्री उशिरा ठकबाजीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सायखेडा पोलिसांनी दि. १६ रोजी दिली आहे.
चांदोरी गावाजवळील नागापूर येथील द्राक्ष उत्पादक विठोबा खालकर यांनी त्यांच्या नागापूर शिवारातील गट क्रमांक ३१०, ३११, २७४, २७५ यातील द्राक्ष मालाची विक्री केली होती. खालकर यांनी ३३ रुपये किलो दराने १ हजार ९६० किलो माल तर १९ हजार ६० किलो द्राक्ष ३५ रुपये किलो दराने असा एकूण १३ लाख ३७ हजार ६६० रुपये किमतीचा माल संशयित व्यापारी भारत वराडे, आनंद चव्हाण दोघेही राहणार सय्यद पिंपरी यांना एप्रिलच्या द्राक्ष हणमंत दिला होता. या व्यवहारापैकी संशयितांनी द्राक्ष उत्पादक विठोबा खालकर यांना केवळ २ लाख रुपये परत दिले उर्वरित ११ लाख ३७ हजार ६६० रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खालकर यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात दि. १५ गुरुवार रोजी फिर्याद दिली. पोलिसांनी दि. १५ रोजी आरोपींविरुद्ध ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक अडसूळ यांनी दिली. दरम्यान, आरोपींना दि. १५ रोजी सायंकाळी उशिरा अटक करण्यात आली असल्याची माहिती सायखेडा पोलिसांनी दिली.