जळगाव नेऊर : दोन महिन्यंपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. कोरोनाच्या विळख्यात शेतमालही सापडल्याने शेतकऱ्यांपुढे ऐन खरीपात भांडवलाची चिंता उभी ठाकली आहे. अनेक शेतक-यांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाली तर अनेकांचा कांदा कवडीमोल दराने विकला जात असून, भाजीपाल्यावर नांगर फिरविण्याची वेळ शेतक-यांवर आल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतक-यांना बसला. वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेली द्राक्षे मातीमोल भावाने विकावी लागली. यामुळे झालेला खर्च देखील वसूल झाला नाही. काही शेतक-यांच्या द्राक्षबागेत झाडावरच मनुके तयार झाली, तर अनेक शेतक-यांनी आहे त्या द्राक्षबागा खाली केल्या. द्राक्षांपाठोपाठ कांदा भाव कोसळले. निर्यात खुली होण्याच्या आशेवर अनेक शेतक-यांनी कांदा साठवला आणि ऐन वेळेसच कोरोनाचा प्रकोप वाढला. लॉकडाऊन, संचारबंदीत बाजार समिती चालू-बंद राहिल्याने कांदा उत्पादक शेतक-यांना मिळेल त्या दराने कांदा विक्र ी करावा लागला. आता, बाजार समित्या सुरु झाल्या पण मिळणा-या भावाने शेतक-यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाजीपाल्याचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अनेक शेतकºयांनी आपल्या भाजीपाला पिकावर नांगर फिरवला तर काही शेतक-यांनी भाजीपाला शेतात जनावरे सोडून दिली. कोरोनाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांपुढे खरीपाच्या भांडवलाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.