नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेशाचा आलेख यावर्षी मोठ्या प्रमाणात घसरला असून गेल्या काही वर्षात कृषी अभ्यासक्रमांची मान्यता रद्द झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशात झालेल्या घसरणीमुळे विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेविषयी नाशिक विभागीय केंद्राचे संचालक डॉ. धनंजय माने व कक्ष अधिकारी विलास दशपुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानुसार नाशिक विभागीय केंद्रांतर्गत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील ३१७ अभ्यास केंद्रावर केवळ २४ हजार ४३० प्रवेश झाले आहेत. गतवर्षी हे प्रमाण तब्बल ९० हजारांपर्यंत होते. तर मागील वर्षी विद्यापीठात जवळपास ६ लाखांहून अधिक प्रवेश नोंदवले गेले असताना यावर्षी विद्यापीठात आतापर्यंत विविध अभ्यासक्रमांचे केवळ १ लाख ५२ हजार ८१२ प्रवेश झाले आहेत. विशेष म्हणजे विविध इलेक्ट्रॉनिक माध्यातून जाहिरात बाजी करूनही विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अद्याप विद्यापीठ अंतर्गत प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झालेली नसून राज्यातील अन्य विद्यापीठांच्या परीक्षांचे निकालही जाहीर झालेले नसल्याने प्रवेशाच्या संख्येत घट झाली असल्याचे कारण विद्यापीठाकडून दिले जात आहे,
इन्फो-
नवीन अभ्यासक्रमांना ही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा
मुक्त विद्यापीठाने मोठा गाजावाजा करीत एम. ए मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू , लोकप्रशासन यासह एमएससीचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र , वनस्पती विज्ञान, जैवविज्ञान, गणित व पर्यावरण यासारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले होते. यातील बहुतांश अभ्यासक्रमांना मर्यादित जागा उपलब्ध असतानाही यातील बहुतांश अभ्यासक्रम ही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करावी लागते आहे.
कोट-
विद्यापीठातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झालेले नाही. त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्यास मदत होणार आहे. प्रवेश प्रक्रियेवर कोविडचा ही परिणाम झाला आहे. मात्र येणाऱ्या काळात ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा ६ लाखांपर्यंत निश्चितच पोहोचू शकेल.
- ई वायूनंदन, कुलगुरू , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ