लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिकच्या नाट्यसंस्कृतीचा मानबिंदू म्हणून ओळखले जाणारे महाकवी कालिदास कलामंदिर दुरुस्ती व देखभालीसाठी एक वर्ष बंद राहणार असल्याने या नाट्यगृहाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने ‘नाट्यसेवा’तर्फे एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या या एकांकिका महोत्सवात नाट्यगृहाने नवकलाकारांसाठी उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ तसेच या रंगभूमीने घडवलेले कलाकार यांच्याबाबत बोलताना अखिल भारतीय नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी या प्रकारचा महोत्सव राबविणे ही अभिनव संकल्पना असल्याचे सांगितले. नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांनी आगामी काळात कालिदास कलामंदिरचे नवे रूपडे रसिकांसमोर येईल तेव्हा नाटकेही नव्या रूपात यायला हवी, तसेच तिच तिच नाट्यकलाकृती सादर करण्यापेक्षा रंगकर्मींनी बदल घडवून आणणे आवश्यक आहे, याकडेही सचिन शिंदे यांनी लक्ष वेधले. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आरामासाठी आतुरतेने वाट पहाणाऱ्या तसेच सुटीचा आनंद लुटणारा रविवार आल्यावर आयुष्यात कसे आमूलाग्र बदल घडतात याचे दृश्य ‘एव्हरी डे इज संडे’ या एकांकिकेतून दाखविण्यात आले. शंतनू चंद्रात्रे लिखित आणि रोहित पगारे दिग्दर्शित या एकांकिकेत मनाली धात्रक, रोहित पगारे, सतीश वराडे या कलाकारांचा समावेश होता तर गरज आणि लालसेतून माणसाला कुठल्या कुठल्या टप्प्यातून जावे लागते याचे दृश्य ‘मसणदान’ या एकांकिके तून दाखविण्यात आले. एकांकिका महोत्सवाची सांगता धनंजय गोसावी आणि राहुल गायकवाड दिग्दर्शित ‘फारमर’ या नाटकाने झाली. यावेळी माणिक कानडे, प्रकाश साळवे, विद्याधर निरंतर, सुनील ढगे, राजेंद्र जाधव, श्याम लोंढे यांच्यासह नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकांकिकांमधून ‘कालिदास’प्रती कृतज्ञता
By admin | Published: July 15, 2017 12:22 AM