नाशिक : नाशिकरोडजवळ चाडेगाव शिवारातील एका द्राक्षाच्या मळ्यात डुकरांना पायबंद घालण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मंगळवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या अडकला. बिबट्याच्या डरकाळ्या शेतकऱ्यांच्या कानी आल्या. शेतकºयांनी मळ्याच्या दिशेने धाव घेतली असता भला मोठा बिबट्या बघून त्यांची पाचावर धारण बसली. महापालिका हद्दीतील चाडेगाव शिवारातील संदीप पांडुरंग वाघ यांच्या द्राक्षमळ्यात मृतावस्थेत पडलेल्या डुकरावर ताव मारण्याच्या इराद्याने बिबट्याने हजेरी लावली; मात्र डुकरांच्या उपद्रव थांबविण्यासाठी लावलेल्या तारेच्या जाळ्यात तो अडकला. सुटकेसाठी सुमारे पाच तास त्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र बिबट्याला यश आले नाही. सदर घटनेची माहिती शेतकºयांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याला कळविली व पोलिसांनी तत्काळ वनविभागाला पाचारण केले. नाशिक पश्चिम विभागाच्या उपवनसंरक्षक टी. ब्यूला एलिल मती यांनी तत्काळ रेस्क्यू पथकाला घटनास्थळी रवाना केले. प्रौढ नर बिबट्या संपूर्णत: खुला होता केवळ त्याचा मागील पाय आणि शेपटीला तारेचा वेढा बसलेला होता त्यामुळे त्याला निसटता येत नव्हते. बिबट्या प्रचंड आक्रमक झाल्याने त्याला सुरक्षित जेरबंद करण्याचे आव्हान वनविभागाच्या पथकापुढे उभे राहिले. पोलिसांनी बघ्यांची गर्दी थोपवून धरली. त्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षकांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळून बिबट्याला ‘ट्रॅन्क्युलाइज गन’द्वारे डार्ट देऊन बेशुद्ध केले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट मादीने शेतकºयांना दर्शन दिले. मळे भागात पिंजरा तैनात करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.डुकरांच्या उपद्रवाने निमंत्रणनाशिकरोडजवळील सामनगाव, चाडेगाव, गोरेवाडी, एकलहरारोड, पळसे या मळे भागात मोकाट कुत्रे, डुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्या द्राक्ष मळ्यात पोहचला असावा, असा दावा वनविभागाच्या अधिकाºयांनी केला आहे. दरम्यान, या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.उसाच्या शेतातून बिबट्या द्राक्षबागेतवाघ यांच्या द्राक्षबागेला लागून उसाचे शेत आहे. या शेतात जंगली डुकरे अधिक आहे. डुकरांचा पाठलाग करताना बिबट्या शेतात आल्याचे प्रत्यक्षदर्शी अनिल सातपुते यांनी सांगितले. यावेळी डुकरावर बिबट्याने हल्लाही चढविला; मात्र द्राक्षबागेला लागून असलेल्या तारेसह जाळ्यात बिबट्या अडकून पडला. बिबट्याच्या हल्ल्याच एक डुक्कर मृत्युमुखी पडले आहे. उसाच्या शेतात डुकरांची संख्या अधिक असून, बिबट्या व डुकरांमध्ये नेहमी झटापट होत असते, अशी माहिती सातपुते यांनी दिली.