नाशिक - राज्यभर कचरा कोंडीचा विषय गाजत असला तरी नाशिक महापालिकेच्या वतीने मात्र कचऱ्यावरील सेंद्रीय खत तयार केली जात असून गेल्या महिन्यात सुमारे साडे चार हजार टन कंपोस्ट खताची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे महापालिकेने अडीच हजार रूपये दर ठरविले असताना शासनाने सबसिडी दिल्याने अवघ्या एक हजार रूपयांत एक टन खत मिळत असून त्यामुळे गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
महापालिकेच्या वतीने घरगुती ओल्या कच-यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा प्रकल्प राबविला जातो. २००१ मध्ये महापालिकेने सुरू केलेला हा प्रकल्प गेल्या वर्षभरापासून खासगीकरणातून राबविला जात असून त्यासाठी नाशिक वेस्ट मॅनेमेंट कंपनी स्थापन करण्यात आली आहे. महापालिकेच्या या प्रकल्पात तयार होणारे सेंद्रीय खत खरेदीसाठी शेतकरी उत्सुक असतात. महापालिकेने एक टन खतासाठी अडीच हजार रूपये दर निश्चित केले आहेत. मात्र, तीन महिन्यांपूर्वी राज्यशासनाने राज्यातील महापालिकेच्या कचºयापासून खत प्रकल्प निर्मितीच्या प्रकल्पासाठी टनामागे दीड हजार रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून शेतकºयांना रास्त दरात सेंद्रीय खत देण्यासाठी दर एक हजार रूपयांपर्यंत ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचा लाभ महापालिकेने घेतला असून शासनाच्या महाकंपोस्ट या ब्रॅँडखाली एक टनासाठी एक हजार रूपये मोजून खताची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे खताला मागणीही वाढली आहे. गेल्या महिन्यांपर्यंत साडे चार हजार टन खत तयार होते ते विकले गेले आहे. अर्थात, महापालिकेच्या खत प्रकल्पात दरमहिन्याला बाराशे ते चौदाशे टन सेंद्रीय खत तयार होत आहे. त्यामुळे नवीन खत उपलब्ध झाले आहे.महापालिकेचा हा प्रकल्प घन कच-या व्यवस्थापनात उपयुक्त ठरला आहेच, शिवाय शेतकरी आणि कंपनीला देखील लाभदायी ठरला आहे.