नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून अद्यापपर्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणलोटक्षेत्रातून पाण्याची जोरदार आवक धरणात होऊ लागल्याने सकाळी नऊ वाजता सोडण्यात आलेल्या ११ हजार क्युसेकच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून सध्या १३ हजार क्युसेक पाणी गोदापात्रात प्रवाहित आहे. दुतोंड्या मारूतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली असून नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस पश्चिम, मध्य महाराष्टÑासह कोकण व नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. घाटक्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढला आहे. त्यामुळे गंगापूर धरणात त्र्यंबक, अंबोली या पाणलोटक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. परिणामी गंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यावर पोहचला. सकाळी नऊ वाजेपासून विसर्गात वाढ करण्यात आली आहे. अकरा वाजेपासून गोदावरीच्या जलस्तर उंचविण्यास सुरूवात होऊ लागली.शहरातदेखील मध्यरात्रीपासून संततधार सुरू असल्यामुळे अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात १३ हजार ३३० क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे. मागील २४ तासांत शहरात ३३ मि.मी इतका पाऊस नोंदविला गेला. गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा, चांदोरी या भागातदेखील गोदावरीची पातळी वाढली असून सायखेड्याच्या धोकादायक पुलाला पूराचे पाणी लागले आहे. तसेच गोदाकाठावरील दुतोंड्या मारूतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली आहे. नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू पुलाला पाणी लागले असून विसर्गात वाढ झाल्यास या पुलावरूनही पूराचे पाणी वाहण्याची दाट शक्यता आहे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या पूलांवर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला, तर गंगा-गोदावरी मंदिरासह वस्त्रांतरगृहातही पाणी शिरले. गोदाघाटावरील लहान पूल, मंदिरे पाण्याखाली गेली. देवमामलेदार मंदिर, नीळकंठेश्वर मंदिरासह नारोशंकर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. यामुळे विक्रेत्यांनी तत्काळ नदीकाठापासून आपली दुकाने सुरक्षितस्थळी हलविली. नीळकंठेश्वर मंदिर ते रामसेतू पुलापर्यंतच्या नदीकाठच्या विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध वस्तूंचा माल तत्काळ भरून घेत टपऱ्या रिकाम्या केल्या. तसेच नागरिकांनी गोदाकाठालगत असलेली वाहने काढून घेतले आहे. गंगापूर धरणातून होणाºया विसर्गाची पूर्वसूचना मिळाल्याने गोदाकाठावरील रहिवाशांसह विक्रेतेही सतर्क झाले होते.