सटाणा : शहरात सापडलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दिली. निगेटिव्ह अहवालामुळे बागलाणवासीयांना दिलासा मिळाला आहे, मात्र बाधित रुग्णांचे अहवाल जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत सटाणा शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम राहील असेही तहसीलदार इंगळे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. चार दिवसांपूर्वी शहरात एका पोलीस अधिकाऱ्यासह एका डॉक्टरची पत्नी कोरोनाबाधित सापडल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी ११ जणांना डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात विलगीकरण करण्यात आले होते.प्रशासनाने त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. गुरु वारी (दि.७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ११ जणांचा तपासणी अहवाल तहसीलदार इंगळे पाटील यांना प्राप्त झाला असून, सर्वच्या सर्व वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे बागलाणवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.दरम्यान, या अकरा जणांना आता डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयातून सोडले असून, त्यांच्या घरात त्यांना विलगीकरण करण्यात आले असल्याचे वैद्यकीय सूत्रांनीसांगितले. अजूनही बाधित रु ग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासनामार्फत सुरूच असून, आतापर्यंत २८ जणांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरात विलगीकरण करण्यात आले आहे. तर अन्य काही गायब असून, त्यामध्ये एका बोगस डॉक्टरसह एका भोंदू बाबाचा समावेश आहे.---------तरीही शहर प्रतिबंधितच ......शहरात दोन जण कोरोनाबाधित सापडल्यानंतर प्रशासनाने तत्काळ तीन किलोमीटरचे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केले. ११जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असला तरी जोपर्यंत दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांचे दोन अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान या क्षेत्रात किराणा दुकान, मेडिकल, कृषी सेवा केंद्र, भाजीपाला तसेच एका गल्लीतील पाच दुकाने नियमांना बांधील राहून सुरु करण्याचा निर्णयदेखील प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे हळूहळू शहरातील व्यवहार पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.
सटाणेकरांना मोठा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:12 PM