नाशिक : कोरोना काळात अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना अन्न मिळावे, यासाठी केंद्राने मोफत धान्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही सर्वसामान्यांना झाला. अजूनही ही योजना सुरू असून, येत्या सप्टेंबरपर्यंत गोरगरिबांना रेशनवर मोफत धान्य मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यात या मोफत धान्य योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, या याेजनेचा लाभ गोरगरिबांना होत आहे. मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. सर्वप्रथम जून २०२० पर्यंत गोरगरिबांना रेशन दुकानांमधून मोफत धान्य मिळाले. त्यानंतर वेळेावेळी केंद्राने या योजनेला मुदतवाढ दिली असून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरही या योजनेला मुदतवाढ मिळाली आहे. आता सप्टेंबर २०२२ पर्यंत मोफत धान्य मिळणार आहे. दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत दिले जात आहे. कोरोना काळात गेल्यावर्षी मार्चमध्ये जाहीर करण्यात आलेली मोफत धान्य देण्याची पीएमजीकेएवाय योजना ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली सुरू करण्यात आली. त्यानुसार प्रति किलोग्रॅम २ ते ३ रुपये अशा अनुदानित दराने धान्य पुरवले जाते.
योजनेला तिसऱ्यांदा मुदतवाढ
एप्रिल २०२० मध्ये मोफत धान्याची योजना सुरू झाली. २०२०-२१ मध्ये केवळ तीन महिन्यांसाठी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर योजनेत जुलै-नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. जुलै ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत पाच महिन्यांसाठी मुदत वाढविण्यात आली. डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत योजनेचा कालावधी वाढवण्यात आला. आता सप्टेंबर २०२२ पर्यंत मोफत धान्य दिले जाणार आहे.
असे आहेत कार्डधारक
अंत्येादय : १७४३७३
प्राधान्यक्रम : ६१२९२०
नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना येत्या सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. या योजनेला यापूर्वीच मुदतवाढ मिळाली असून, रेशन दुकानांमधून लाभार्थ्यांना धान्य दिले जात आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे धान्य पुरवठा करण्यास अडचणी येत असल्या, तरी प्रत्येक लाभार्थ्याला धान्य मिळत असल्याचा दावा पुरवठा विभागाने केला आहे. वाहतुकीच्या अडचणी आणि पॉस मशीनमुळे काहीसा अडथळा येत आहे.