नाशिक : ज्यांचे मन शांत आणि डोके शीतल असते, त्याच व्यक्ती जगात काही भव्य-दिव्य कार्य उभे करू शकतात. भडक डोक्याची माणसे अधिक विचार करू शकत नाहीत. त्याउलट शांत चित्त असणारी माणसे कोणत्याही प्रसंगात अधिक विचार करून मार्ग शोधतात. त्यामुळे मन शांत ठेवून उत्साहाने कार्य करा. अशाप्रकारे मन शांत ठेवणे ध्यानाद्वारे शक्य असल्याचे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकरजी यांनी केले.आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने तपोवनात बुधवारी अमृतवर्षा या प्रवचनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीश्री यांनी यावेळी उपस्थित हजारो अनुयायांना मार्गदर्शन केले. श्रीश्री यांनी आपणा सगळ्यांना संपूर्ण देशात आध्यात्माची एक लाट निर्माण करायची असल्याचे सांगितले. अशी आध्यात्मिक लाट निर्माण झाल्यास जनतेमधील अनिष्ट विचार, वाईट सवयी आपसूकपणे कमी होतील, असेही त्यांनी नमूद केले. स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित समाज आपल्यालाच घडवायचा आहे. आपल्या आसपास सातत्याने चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. त्या प्रत्येक बाबीवर आपल्याला काही करता येईलच असे नाही. सारंच काही ठीक करता येईल, असे नाही. अशावेळी शक्य तेवढे चांगले करून अन्य सर्व बाबी ईश्वरावर सोडून द्या, असेही श्रीश्री यांनी नमूद केले. ध्यानामुळे अनेक गोष्टी साध्य होत असल्याने दररोज काही मिनिटे तरी ध्यानधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक कार्यात कर्मकांड नव्हे तर ध्यान आणि मंत्रोच्चार महत्त्वाचे असतात, असेही त्यांनी नमूद केले. प्रारंभी विक्रम हाजरा यांनी गोविंद कृष्ण हरी ओम, जीवन खेल है सगुण ब्रह्म का ही भक्तिगीते सादर केली...तर जीवनात आनंदवर्षा !जीवनात गुरूंचे सान्निध्य लाभले तर चेहऱ्यावरील हास्य कमी होत नाही. अनेक अनावश्यक बाबी आपला मेंदू विसरून जातो. त्याप्रमाणेच जीवनात घडलेल्या सर्व अनिष्ट बाबी, राग, लोभ झटकून टाका. त्यांना आपल्या आतमध्ये ठाण मांडू देऊ नका. तुम्हाला अध्यात्मातून मिळालेला आनंद, जीवनातून मिळालेले ज्ञान इतरांना वाटा. जीवन हे एखाद्या स्वप्नासारखे वाटले तरच जीवनात आनंद वर्षा होत राहते, असेही श्रीश्री रवीशंकरजी यांनी अनुयायांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.
भव्य कार्यासाठी मन:शांती आवश्यक : श्रीश्री रविशंकरजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:10 AM