नाशिक : उंच इमारती, भरपूर संपत्ती, शस्त्रास्त्रांनी भरलेला देश म्हणजे मोठा देश ठरत नाही. तर ज्या देशात चारित्र्यवान, कर्तृत्ववान, प्रामाणिक माणसे आहेत तो देश मोठा ठरतो. त्या देशातील नागरिकांचा प्रामाणिकपणा, चारित्र्यवान, परिश्रम घेण्याची वृत्ती या गोष्टी त्या देशाला प्रगतिपथावर नेतात. त्यामुळे प्रत्येकाने चारित्र्यवान आणि प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी केले.कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर नाशिकभूषण पुरस्कार वितरणप्रसंगी इनामदार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, काम करणे हा स्वर्ग तर आळसात बसणे हे नरकात राहण्यासारखे आहे. त्यामुळे आपण स्वर्गात राहायचे की नरकात हे ज्याचे त्याने ठरवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संत गाडगे महाराज नागरी पतसंस्था आणि कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी (दि.१५) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत भक्तिचरणदास महाराज, सावानाचे कार्यवाह श्रीकांत बेणी, मधुकरअण्णा झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. शंकरराव बर्वे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र मालुंजकर, प्रा. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले. आज २५ व्यक्ती व दोन संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
चारित्र्यवान माणसांवरून ठरते देशाची महानता : इनामदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:57 AM
वैविध्यपूर्ण काम करणाऱ्यांचा झाला गौरव
ठळक मुद्दे नाशिकभूषण पुरस्कारवैविध्यपूर्ण काम करणाऱ्यांचा झाला गौरव