सिन्नर : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुक्यात २० गावांमध्ये हरित उपक्रम हाती घेण्यात आला आहे. चास गटातील २० गावांमध्ये वृक्षलागवडीसह त्याचे संगोपन करण्यात येणार आहे. दत्तनगर येथे वृृक्षारोपण करून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. पंचायत समिती सदस्य उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून हजारो रोपांची लागवड व त्यास संरक्षक जाळ्या बसवून त्यांचे संगोपन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक गावात शंभर ते दीडशे रोपे लावून त्यांचे संगोपनही तरुणांमार्फत केले जाणार आहे. रोपे मोठी होईपर्यंत त्यांचे जतन करण्याची जबाबदारी सह्याद्री युवा मंचने घेतली आहे. दत्तनगर येथे १५० रोपांची लागवड करून या हरित उपक्रमास सुरुवात करण्यात आली. कडुनिंब, चिंच, बदाम, आंबा, गुलमोहर या झाडांचे यावेळी पंचायत समिती सदस्य सांगळे यांच्या हस्ते रोपण करण्यात आले. सह्याद्री युवा मंचने या उपक्रमास संरक्षक जाळ्या पुरविल्या आहेत. सरपंच काळूराम पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थ व तरुणांच्या माध्यमातून जास्तीत जास्त गावात हरित सप्ताह साजरा करण्याचे आवाहन उदय सांगळे यांनी केले. येत्या पावसाळ्यात तालुक्यात जास्तीत जास्त रोपांची लागवड करणार असल्याचा संकल्प सांगळे यांनी व्यक्त केला. यावेळी नामदेव पालवे, कैलास पालवे, सहदेव पालवे, नामदेव पालवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विष्णू पालवे यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)
सिन्नर तालुक्यातील २० गावांमध्ये हरित उपक्रम
By admin | Published: June 15, 2016 10:08 PM