नाशिक : शहरातील मखमलाबादरोडवरील जाणता राजा कॉलनीतील एका अपार्टमेंटच्या खिडकीच्या रेलिंगवर सोमवारी (दि.८) दुर्मीळ ह्यहिरवा चापडाह्ण (ग्रीन पिट वायपर) हा अतिविषारी व सहसा आढळून न येणारा सर्प आढळून आला. वनविभागाला माहिती मिळताच इको-एको वन्यजीव संस्थेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी त्यास रेस्क्यू केले.चापडा किंवा हिरवा चापडा या नावाने ओळखला जाणारा सर्प विषारी गटातील असून हा सर्प झाडांवर तसेच झुडुपांवर वेलींवर अधिवास करतो. सर्पांच्या प्रजातींमध्ये चापडा हा सर्प शहरात यापुर्वी कधीही आढळून आला नसल्याची माहिती वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी दिली. जाणता राजा कॉलनीमध्ये सोमवारी सकाळच्या सुमारास एका खिडकीच्या बाहेर असलेल्या लोखंडी रेलिंगवर हिरव्या रंगाचा भला मोठा साप बसलेला असल्याचा ह्यकॉलह्ण वनविभागाला प्राप्त झाला. यानंतर वनअधिकाऱ्यांनी वन्यजीवप्रेमींना संपर्क साधून सर्प रेस्क्यू करण्याची सुचना केली. भोगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन शास्त्रशुध्द पध्दतीने सुरक्षितरित्या सर्पाला रेस्क्यू केले. हा सर्प पुर्णपणे हिरव्या रंगाचा असून विषारी सर्पांपैकी एक आहे. यापुर्वी शहरी भागात तो कोठेही आढळलेला नाही. ज्या खिडकीच्याबाहेर सर्प आढळला सुदैवाने खिडकीबाहेर जाळीदेखील लावण्यात आलेली होती. यामुळे सर्प घरात येऊ शकला नाही. मात्र सर्प बघून घरातील रहिवाशांची चांगलीच भंबेरी उडाली. वन्यजीवप्रेमींनी सर्प रेस्क्यू के ल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सायंकाळी शहराबाहेर नैसर्गिक अधिवासात या सर्पाला मुक्त करण्यात आले.