खामखेडा : सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कमालीचा चिंतित आहे. खामखेडा येथील शेतकरी हिरामण शेवाळे यांनी एक एकर मिरचीसाठी पाउण लाख खर्च करूनही सध्या कवडीमोल दरामुळे उत्पादन खर्चदेखील निघणार नसल्याने शेतातील मिरची उपटून फेकली आहे.खामखेडा परिसर हिरवी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी व्यापारी मिळत नसल्याने त्याचा परिणाम या भागातील भाजीपाला शेतातच सडू लागला आहे. खामखेडा येथील शेतकरी हिरामण नारायण शेवाळे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर लागवड करणे, मशागत, रासायनिक खते, औषधे फवारणी तसेच ड्रिप व मल्चिंग पेपरसाठी असा पाउण लाख रुपये खर्च केला होता.खामखेडा परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरची पिकाची लागवड केली जाते. मिरची या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. दिवसभर मिरची तोडून ती मालेगाव, धुळे, नवापूर, अमळनेर आदी मार्केटमध्ये विक्री करून शेतकऱ्याच्या हाती पैसे येतो. तसेच गुजरात किंवा इतर राज्यांतील शेतकरी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मिरची खरेदीसाठी येतो. यावर्षी सर्वत्र पाणी चांगले असल्याने या परिसरासह मिरची अधिक प्रमाणावर लागवड झाली आहे. मात्र, बाजार बंद असल्याने व सध्या दर नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पिकांवर केलेला खर्च निघणेही कठीण झाल्याचे दिसून आल्याने अखेर शेवाळे यांनी एक एकर क्षेत्रावरील शेतातील उभ्या मिरचीचे पीक हतबल होत उपटून फेकले आहे. मिरचीला सध्या दोन ते तीन रुपये किलो बाजारभाव आहे.मिरची तोडणीसाठी झालेला खर्चही निघणे कठीण झाले असल्याने व त्यातच आता पिक काढून टाकण्यासाठीही खर्च होणार असल्याने शेतकºयांवर लॉकडाउन दरम्यान मोठे संकट आल्याचे दिसून येत आहे.
-------------------------------------------------------
सध्या मिरची काढणी सुरु होती. काढणीसाठीचा खर्चदेखील सुटत नाही. बाहेरचे मार्केट बंद आहे, बाहेर माल घेऊन जाणेही अवघड आहे, त्यातच स्थानिक मार्केट नसल्याने मिरची उपटून फेकली आहे. लॉकडाउनचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.- हिरामण शेवाळे,मिरची उत्पादक, खामखेडा