हिंदूंचा सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी. देशभरात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जात असतानाच यंदा सर्वोच्च न्यायालयाने केव्हाही फटाके वाजविण्यास घातलेले निर्बंध आणि ग्रीन फटाक्यांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दूरगामी आणि पर्यावरण संवर्धन करणारे स्वरूपाचे आहेत. विशेषत: ग्रीन फटाके हा पर्याय खूपच चांगला आहे. त्यामुळे कमीत कमी प्रदूषण होईल, असे मत नाशिक येथील पर्यावरण अभ्यासक प्राचार्य किशोर पवार यांनी व्यक्त केले. फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत त्यांच्याशी झालेली चर्चा अशी...प्रश्न : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध आल्याने बरीच उलटसुलट चर्चा होत आहे. त्याविषयी काय वाटते.प्राचार्य पवार : दिवाळी सण मोठा असला तरी त्यातील फटाके हा विषय काहीसा वादग्रस्त आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके ही कल्पनाच चुकीची आहे. अवघ्या काही तासांत प्रचंड आवाज करणारे फटाके वाजवून त्याची राख होते. या फटाक्यांच्या आवाज आणि प्रकाशामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक यांना प्रचंड त्रास होतो. अन्य नागरिकांनादेखील श्वसनाचे विकार होतात. प्राणी, पक्षी आणि झाडांवरदेखील परिणाम होत असतो. त्यामुळे आता या विषयावर काही तरी निर्णय घेणे अपेक्षितच होते तो घेतला हे चांगले झाले.प्रश्न : ग्रीन फटाक्यांचा पर्याय कसा वाटतो? अनेकांना ग्रीन फटाके म्हणजे काय हेच माहिती नाहीये.प्राचार्य पवार : ग्रीन फटाके म्हणजेच पर्यावरणपूरक फटाके ही संकल्पना नवीन नाहीये. नागपूर येथील नॅशनल एन्व्हायर्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च युनिट म्हणजेच नीरीने याबाबत संशोधन केले आहे. केंद्र सरकारच्या सीआरएसआर संस्थेसह अन्य अनेक संस्थांनी संशोधन केले आहे. पारंपरिक फटाक्यातील अनेक प्रकारची रसायने यात नसतात. मुळात आवाजाचे हे फटाके नसतात. केवळ प्रकाश दिसतो. आकाशात गेल्यानंतरदेखील ते चांदणे होऊन कोसळताना दिसतात. त्यातून कमीत कमी प्रदूषण होते. अनेकदा विदेशातील कार्यक्रमात अशाप्रकारची आतषबाजी आपण बघतो. तोच हा प्रकार असतो, परंतु तो पर्यावरणपूरक असतो. आवाज नसल्याने ध्वनिप्रदूषण होत नाही. धूरही अत्यल्प असतो.प्रश्न : दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणखी काय सांगाल?प्राचार्य पवार : दिवाळी हा सण केवळ फटाके वाजवण्यासाठी नाही. तर आनंद घेणे आणि देणे महत्त्वाचे आहे. आनंदाचे शेअरिंग महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजवंताला त्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वस्तू देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.मुलाखत: संजय पाठक
ग्रीन फटाके सर्वाेत्तम पर्याय, आता पर्यावरणस्नेही होण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:04 PM
दिवाळी हा सण केवळ फटाके वाजवण्यासाठी नाही. तर आनंद घेणे आणि देणे महत्त्वाचे आहे. आनंदाचे शेअरिंग महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजवंताला त्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वस्तू देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
ठळक मुद्देपर्यावरण अभ्यास प्राचार्य किशोर पवार यांचे मतनागरिकांनीच सजग होण्याचे आवाहन