नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या दीडशे तिजोरी खरेदीच्या मुद्द्यावर संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत चर्चा होऊन मार्च २०१६ अखेर पहिल्या टप्प्यात ५० तिजोरी खरेदी करण्यास संचालक मंडळाने हिरवा कंदील दाखविल्याचे वृत्त आहे.गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोट्यवधी रुपयांच्या अत्याधुनिक लोखंडी तिजोरी खरेदीच्या मुद्द्यांवरून संचालक मंडळाभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. कालच्या (दि.२६) बैठकीत मात्र संचालक मंडळाने सुरक्षेच्या मुद्द्याला प्रमाण मानून पहिल्या टप्प्यात अडीच कोटी रुपयांची एका ठरावीक कंपनीकडूनच तिजोरी खरेदी करण्यास अग्रक्रम दिल्याचे समजते. बैठकीत विषयपत्रिकेवरील विषय क्रमांक ८ नुसार ही लोखंडी तिजोरी खरेदीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. बॅँकेच्या तिजोऱ्यांच्या खरेदीसाठी प्रशासनाने आधी दुर्वा एंटरप्राईजेस नामक संस्थेला सुरक्षेविषयक लेखा परीक्षण करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यात या संस्थेने बॅँकेच्या २१३ पैकी १६२ ठिकाणी असलेल्या लोखंडी तिजोऱ्या २० ते २५ वर्ष जुन्या असून, त्या नवीन खरेदी करण्याबाबत सूचित केले होते. बैठकीत त्यावर चर्चा होऊन एकदम इतकी खरेदी केल्यास त्याबाबत काहूर माजेल, हे लक्षात घेऊन बॅँकेच्या सर्वच शाखा व्यवस्थापकांनी त्यांच्या शाखेतील तिजोरी नवीन बसविण्याची गरज आहे किंवा कसे? याबाबत आठ दिवसांत अहवाल सादर करावा. तसेच पहिल्या टप्प्यात १६२ पैकी ५० तिजोरी मार्च २०१६ खरेदी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यामुळे लवकरच याबाबत वृत्तपत्रात जाहिरात काढून निविदा काढण्यात येतील, तसेच त्यानंतर या ५० तिजोरी खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी सांगितले.
अडीच कोटींच्या तिजोरी खरेदीला हिरवा कंदील
By admin | Published: November 26, 2015 11:39 PM