नाशिक : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या निफाड सहकारी साखर कारखाना व नाशिक सहकारी साखर कारखाना मालमत्तेच्या लिलावाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सोमवारी (दि. ३१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाने या दोन्ही कारखान्यांकडील थकीत वसुली करण्यासाठी या कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीच्या प्रस्तावास मंजुरी दिली. अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक झाली. जवळपास दोनशे कोटीहून अधिक थकबाकी असलेल्या या दोन्ही कारखान्यांकडील वसुलीसाठी या दोन्ही कारखान्यांवर अवसायक नेमून या कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी मध्यंतरी जिल्हा बॅँकेने कार्यवाही सुरू केली होती. मात्र राज्य शासनाने साखर कारखाने विक्रीसाठी बंदी आणल्यानंतर हा विषय मागे पडला होता. नाशिक साखर कारखाना सुरू करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेत भाजपा पदाधिकारी असलेले एक प्राधिकृत मंडळही नियुक्त केले होते. मात्र सिक्युराईझन अॅक्टखाली कोणत्याही परिस्थितीत या कारखान्यांच्या मालमत्तांची विक्री करून जिल्हा बॅँकेची सुमारे दोनशे पंचवीस कोटींची थकबाकी वसुली करण्यासाठी कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय मंजुरीसाठी ठेवला होता. सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमुखाने हा ठराव मंजूर करण्यात येऊन कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी हिरवा कंदील दाखविला आहे.राजीनामा नाहीचसोमवारी होणाºया बैठकीत अध्यक्ष नरेंद्र दराडे हे स्वत:हून अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, असे भाजपाच्या संचालकांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात आपण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राजीनामा दिला असून, नव्याने बैठकीत कशासाठी राजीनामा द्यायचा, असा पवित्रा दराडे यांनी घेतल्याने या भाजपाच्या संचालकांचा संताप झाल्याचे समजते. त्यामुळे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी आता या संचालकांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
अवसायनातील कारखाने विक्रीसाठी हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:40 AM