नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या ब्लु लाइन (निळी रेषा)बाबत माहिती सादर न केल्याने नाशिकच्या पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यास पुण्याच्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जामीनपात्र वॉरंट बजावण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला फिरते सांडपाणी प्रक्रिया केंद्र तात्पुरत्या स्वरूपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीपात्रावर कॉँक्रीटचा स्लॅब टाकून बंदिस्त करण्यात आला असून, उगमापासूनच गोदावरी नदी प्रदूषित होत आहे. यासंदर्भात पुण्याच्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल करण्यात आली आहे. गोदावरी नदीलगत निषिद्ध क्षेत्र असलेली निळी रेषा सादर करण्याचे आदेश यापूर्वी या न्यायाधिकरणाने दिले होते; परंतु त्यावर पाटबंधारे खात्याकडून कार्यवाही होत नसल्याने अखेरीस सोमवारी न्यायाधिकरणाचे न्या. किनगावकर आणि सदस्य अभय देशपांडे यांनी सदरचे आदेश दिले आहेत. याचवेळी गोदावरी नदीत सांडपाणी थेट सोडण्याऐवजी प्रक्रियायुक्त मलजल सोडले पाहिजे यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला फिरते सांडपाणी प्रक्रिया केंद्र कुंभमेळ्यापर्यंत राबविण्याचे आदेश दिल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले.
हरित न्यायाधिकरण: त्र्यंबकेश्वर गोदावरी प्रकरणी आदेश
By admin | Published: December 23, 2014 12:08 AM