नाशिक : रक्ताविना परंतु रक्तानेच जोडल्या गेलेल्या नात्याची वीण अधिक घट्ट व्हावी यासाठी अर्पण थॅलेसेमिया सोसायटी आणि आयएमए अर्पण थॅलेसेमिया केअर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तमित्र व रक्तसंघटक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या पालकांसह संस्थेच्या वतीने रक्तदात्यांना कृतज्ञतेचा सलाम करण्यात आला.शालिमार येथील आयएमए सभागृहात आयोजित कार्यक्रमांतर्गत पाच रक्तदात्यांना रक्तमित्र व जे रक्तदान शिबिरांचे नित्यनेमाने आयोजन करून केअर सेंटर आणि सोसायटीला मोलाचे सहकार्य करतात अशा काही रक्तसंघटकांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर महिंद्र अॅण्ड महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण अहेर, थॅलेसेमिया केअर सेंटरचे अध्यक्ष नरेंद्र शहा, क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीचे अतिरिक्त सहायक व्यवस्थापक अलोक खरे, कांतीलाल चोपडा, अतुल जैन, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर तातेड आदि उपस्थित होते. आई-वडील जर मायनर थॅलेसेमिया वाहक असतील, तर त्यांचे जन्माला येणारे मूल थॅलेसेमिया आजाराने पीडित जन्माला येऊ शकते. थॅलेसेमियाग्रस्त बाळाला दर महिन्याला रक्तसंक्रमण करावे लागते. या बालकांच्या शरीरात रक्तनिर्मितीची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे त्यांचे जीवन हे रक्तदात्यांच्या रक्तावरच अवलंबून असते. रक्तसंक्रमण सातत्याने करावे लागत असल्यामुळे अशा बालकांना रक्तावाटे पसरणाऱ्या आजारांची भीतीही अधिक असते. त्यामुळे एलाईजा व नॅट अशा दोन्ही तपासण्या झालेल्या रक्ताच्या पिशव्या आयएमए अर्पण थॅलेसेमिया केअर सेंटरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. अद्याप केंद्राच्या वतीने सुमारे चार हजार रक्तपिशव्यांचे मोफत संक्रमण करण्यात आले असून, सध्या केअर सेंटरमध्ये १९४ थॅलेसेमियापीडित मोफत उपचार घेत असल्याची माहिती डॉ. राजेश कुचेरिया यांनी दिली. प्रारंभी जी. टी. डान्स अकादमीच्या युवा कलावंतांनी ‘ये आशाएॅँ...’ ही लघुनाटिका सादर के ली. (प्रतिनिधी)
रक्तदात्यांना सलाम कृतज्ञतेचा !
By admin | Published: November 03, 2014 12:09 AM