नाशिक : मराठी साहित्यामध्ये आणि विशेष करून नाटक व रंगभूमी याला आपल्या बांधेसूद, कल्पक आणि विलोभनीय लेखणीने अजरामर करणारे लोकप्रिय नाटककार म्हणून वसंत कानेटकर यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागतो. एक नाटककार म्हणून त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक, मानसशास्त्रीय, घरगुती आणि त्याचवेळेस पुराणातून आलेले संघर्षमय असे विषय समर्थपणे हाताळले. विविधांगी विषय हाताळणारे कानेटकर हे अतुलनीय प्रतिभावंत होते. म्हणूनच आजही त्यांची नाटके सदैव टवटवीत वाटतात, अशा भावना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयात मान्यवरांनी व्यक्त केल्या.
ज्याठिकाणी मराठी माणूस पोहोचला, अशा सर्वदूर गावांतून, शहरांतून तसेच परदेशातून त्यांची जनशताब्दी मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. त्यातून नव्या पिढीपर्यंत त्यांचे साहित्य पोहोचत आहे, ही गौरवास्पद बाब आहे, असे मत त्यांच्या स्नुषा अंजली कानेटकर आणि नाशिकचे रंगकर्मी सदानंद जोशी यांनी व्यक्त केले. लोकहितवादी मंडळ आणि ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जन्मशताब्दी प्रारंभ प्रतिमापूजनप्रसंगी त्यांनी विचार व्यक्त केले. प्रारंभी मंडळाचे कार्याध्यक्ष आणि नाटककार मुकुंद कुलकर्णी यांनी स्वागत करताना नाटककार वसंत कानेटकर हे साक्षेपी समीक्षकही असल्याचे सांगितले. कानेटकर हे शिस्तबद्ध लेखनासाठी ओळखले जात, असे सांगितले. एक नाटककार विविध प्रकारचे विषय अत्यंत ताकतीने हाताळतो, त्यांची नाटके रंगभूमीवर प्रचंड यशस्वी होतात, असे हे दुर्मीळ उदाहरण असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. मंडळाचे कार्यवाह सुभाष पाटील यांनी आभार मानले. यावेळी कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवेकर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, किरण समेळ, संजय करंजकर, डॉ. शंकर बोऱ्हाडे, हेमंत देशमुख, अमोल जोशी आदी उपस्थित होते.
फोटो
२० कानेटकर संमेलन