नाशिक : नाशिकचे नाव अवघ्या विश्वात नेणारे वि. दा. सावरकर, कुसुमाग्रज, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, दादासाहेब फाळके आणि वसंतराव कानेटकर यांच्या कलाकृतींना रंगमंचावर जिवंत करून नाशिकच्या या ग्रामदैवतांना ‘पंचप्राण’ या अनोख्या कार्यक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले.जनस्थान व्हॉट्सअॅप ग्रुपच्या वतीने प. सा. नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पं.अविराज तायडे, मकरंद हिंगणे आणि डॉ. आशिष रानडे यांनी पं. पलुस्कर यांची ठुमक चलत रामचंद्र, रघुवर तुमको मेरी लाज, चलो मन गंगा ही भजने सादर केली. तसेच पं. पलुस्कर यांच्या धूनवर गांधीजींकडून प्रार्थना म्हणून गायले जाणारे रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम हे भजनदेखील सादर केले. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सचिन शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केली, तर कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या कवितांचे अंश किशोर पाठक आणि सदानंद जोशी यांनी सादर केले. त्यात तुम्ही जेव्हा माझ्याशी बोलता, प्रेम कर भिल्लासारखं, तृणाचे पाते चमके, गाभारा आणि सर्वात्मका सर्वेश्वरा या कवितांचे सादरीकरण झाले. काही काव्यांवर नृत्यांगना सुमुखी अथणी आणि सहकाऱ्यांनी नृत्यदेखील सादर केली. यावेळी कलाकारांना तबल्यावर नितीन पवार, नितीन वारे आणि सुजीत काळे यांनी, संवादिनीवर सुभाष दसककर यांनी साथ दिली.सावरकरांच्या प्रतिभेचा आविष्कार उलगडलानाटककार वसंत कानेटकर यांच्या अखेरचा सवाल नाटकातील एका प्रसंगाचे सादरीकरण नूपुर सावजी आणि लक्ष्मी पिंपळे यांनी केले. तसेच ‘बेईमान’ नाटकातील एका प्रसंगावर प्राजक्त देशमुख आणि श्रीपाद देशपांडे यांनी सादरीकरण करीत दाद मिळविली. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अफाट प्रतिभेचा आविष्कार उलगडून दाखविला. सावरकरांच्या विविध पैलंूचे दर्शन स्वानंद बेदरकर आणि नृत्यांगना कीर्ती भवाळकर व शिष्यांनी घडविले.
नाशिकच्या ‘पंचप्राण’ना अभिवादन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:25 AM