सिन्नर: तालुक्यातील सोनारी येथे लान्सनायक शहीद राकेश आणेराव यांच पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी सरपंच किसन शिंदे, गोवर्धन पतसंस्थेचे अध्यक्ष रामनाथ डावरे, उद्योजक तानाजी पवार , आझाद पतसंस्थेचे अध्यक्ष युनुस शेख,कोनांबेचे माजी सरपंच संतोष डावरे, वीरपिता राकेश आणेराव , शहीद राकेश आणेराव यांचे बंधु सैन्यातील जवान सुदेश आणेराव, योगेश आणेराव , वसंत शिंदे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. पंधरा वर्षापूर्वी जम्मु काश्मिर येथील निशांतबाग श्रीनगर परिसरात 13 राष्ट्रीय रायफल्स चे जवान ऑपरेशन रक्षक तीन मोहिम राबवत होते. यावेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सोनारीचे लान्सनायक राकेश आणेराव यांना वीरमरण आले होते. पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त यावेळी शहीद राकेश आणेराव यांच्या पुतळ्याचे राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते पुजन करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शहीद राकेश आणेराव स्मारक परिसरात राजाभाऊ वाजे , शरद रत्नाकर, वसंत गोसावी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वदेशी वस्तुंचा वापर ही शहीदांना खरी श्रद्धांजली असल्याने स्वदेशीचा संकल्प करण्यात आला. चिनी वस्तुंचा वापर न करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. शहीद राकेश आणेराव स्मारक समिती व सोनारी येथील परममित्र वाळीबा शिंदे सर शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी पंढरपूर वारीतील दिंडीसाठी दरवर्षी 1100 निधी व औषधे दिली जाते. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ही मदत देण्यात आली. प्राचार्य शरद रत्नाकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुदाम शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.