नाशिक : महाराष्ट्रात माळी समाजाचा लोकसंख्येत दुसरा क्रमांक असतानादेखील सामाजिक आणि राजकीय विकासाच्या बाबतीत शासनाची दुटप्पी भूमिका असून, आश्वासनापलीकडे कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने माळी समाजात नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर माळी समाजाच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिराचे सोमवारी (दि.१६) बोरिवली येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंचवटी येथे झालेल्या माळी समाजाच्या बैठकीदरम्यान माळी समाजाचे ज्येष्ठ नेते बाजीराव तिडके यांनी दिली. सोमवारी बोरकरवाडी, बोरिवली येथील रॉयल गार्डन येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरात माळी समाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून, राज्य सरकारने इतर जातीतील मंत्रिपदाच्या तुलनेत माळी समाजालाही मंत्रिपद द्यावे, राज्य सरकारने स्वतंत्रपणे ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी त्वरित करून यासाठी शासनाच्या तिजोरीतून ५२ टक्के स्वतंत्र निधी देण्यात यावा, शासनातर्फे मागासवर्गीय आयोगाची घोषणा करण्यात आली असली तरी यात अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदासाठी ओबीसी समाजातील व्यक्तीची निवड करणे आदिंबाबत मागणी करण्यात येणार आहे. माळी समाजापुढे असणाऱ्या विविध प्रश्नांमुळे या समाजाचे खच्चीकरण करण्याचा डाव तर नाही ना अशी भावना समाजबांधवांच्या मनात निर्माण झाली आहे. यावेळी सोमवारी बोरिवली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय चिंतन बैठकीसाठी माळी समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
माळी समाजात नाराजीचा सूर
By admin | Published: January 16, 2017 1:17 AM