मनमाड : सध्या कडाक्याच्या थंडीने उच्चांक गाठला असून, या जीवघेण्या थंडीमध्ये रेल्वे फलाट हेच घर असलेल्या बेवारस जीवांना लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटीच्या पुढाकाराने ऐन थंडीतही ऊब मिळाली आहे. स्थानकातील फलाट, बुकिंग आॅफिस आदी भागात थंडीत कुडकुडणाºया बेवारसांना क्लबच्या वतीने ब्लॅँकेट तसेच स्वेटरचे वाटप करण्यात आले.रेल्वेचे मोठे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या मनमाड शहरात देशाच्या विविध भागातून घरदार सोडून आलेले भिकारी तसेच कुणीही वारस नसलेले बेवारस आश्रयाला येत असतात. दिवसभर रेल्वे फलाटांवर आलेल्या गाड्यांमध्ये भीक मागून ते आपला उदरनिर्वाह करतात. रात्रीच्या वेळी फलाटावर, जिन्याखाली व जेथे सहारा मिळेल तेथे ही मंडळी झोपलेली दिसतात. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. चार भिंतींच्या आडसुद्धा थंडी सहन करणे अवघड झालेले असताना रेल्वेस्थानकात आश्रयाला असलेली ही मंडळी मात्र उघड्यावरच कुडकुडत पडत आहे. काही ठिकाणी या थंडीमुळे उघड्यावर झोपलेल्या अनोळखी इसमांना प्राण गमवावा लागला आहे. त्यांचे दु:ख जाणून मनमाड येथील लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटीने पुढाकार घेऊन या बेवारसांना स्वेटर व ब्लॅँकेट वाटप करण्याचा उपक्रम राबवला. रात्रीच्या सुामारास क्लबच्या सदस्यांनी फलाटावर कुडकुडत झोपलेल्या निराश्रितांच्या अंगावर ब्लॅँकेट टाकून थंडीपासून रक्षण केले. यावेळी लायनेस अध्यक्ष साधना पाटील, सचिव वैशाली वाणी, रजनी सुळ, डॉ. अर्चना राठी, डॉ. संगीता हाके, पूनम संकलेचा, सीमा कुलकर्णी, सविता गिडगे, रेखा पाईक, अर्चना घोडके, नेहा गुजराथी आदी सदस्य उपस्थित होत्या.
फलाटावर कुडकुडणाऱ्या जीवांना मिळाली ‘उब’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 6:33 PM