नाशिक : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करीत जिल्हा प्रशासाने वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यावसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात किरकोळ किराणा दुकानदारांना घरपोच सेवा देण्याची सवलत दिली असली, तरी दुकानाचे शटर उघडताच मनपा प्रशासन व पोलिसांकडून कारवाई होत असल्याने दुकानाचे शटर न उघडता मालाची डिलिव्हरी देणार कशी, असा सवाल उपस्थित करीत नाशिक शहरातील किरकोळ किराणा दुकानदारांनी सलग दुसऱ्या दिवशीही बंदमुळे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
नाशिक शहरातील किरकोळ दुकानदारांना जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या निर्बंधांतून शिथिलता देत घरपोच सेवा देण्याची सवलत दिली आहे. मात्र, किरकोळ ग्राहकांना अर्धा किलो, पावशेरच्या वजनातील ती ते चार वस्तूंची घरपोच सेवा देण्यासाठी येणारा खर्च वस्तूंच्या एकूण किमतीएवढा अथवा त्याहूनही अधिक येत असल्याने घरपोच सेवा देणे परवडणार कसे, असा सवाल किरकोळ किराणा व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे मनपाचे अधिकारी व पोलिसांकडून दुकानाचे अर्धे शटरही उघडू देत नाहीत. अशा परिस्थिती ग्राहकांनी ऑनलाइन पाठविलेल्या किराणा मालाची यादीची पूर्तता कशी करायची, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे किराणा दुकानदारांनी शुक्रवारीही (दि.१४) सेवा बंद ठेवून प्रशासनाविरोधात निषेध नोंदविला. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मात्र हाल होत आहेत. हातावर जीवन जगणाऱ्यांचा पैशांची जुळवाजुळव करून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीचा पर्यायही बंद झाल्याने दोन वेळच्या अन्नासाठी उसनवारी करण्याची वेळ आली आहे.
कोट-१
किराणा दुकानांसाठी यापूर्वी दिलेली ७ ते ११ वाजेपर्यंतची वेळ दुकानदार आणि ग्राहकांसाठीही योग्य होती. आता शटर उघडल्यास पाच हजार रुपयांचा दंड केला जातो. दुसरीकडे ग्राहकांकडून एक किंवा दोन हजार रुपयांच्या किराणा मालाची मागणी होते. अशा परिस्थिती शटर उघडून माल देण्यापेक्षा दुकान बंद ठेवणेच परवडणारे असल्याने दुकानदारांनी दुकानांसोबतच व्यावसायही बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-महेंद्रभाई पटेल, अध्यक्ष, किरकोळ किराणा व्यापारी संघटना, नाशिक