लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तब्बल १५ वर्षांनंतर येथील सरपंचपद हे सर्वसाधारण झाल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. परंतु दोन वर्षांपासूून थेट जनतेतून सरपंचही निवडला जाण्याच्या हालचाली सुरू असल्याने इच्छुकांमध्ये चलबिचल होती. वॉर्डातून निवडून जाऊन सरपंच होणास इच्छुक उमेदवारांचे या निर्णयामुळे मनसुबे उधळले आहेत. थेट सरपंच निवडीचे काहींकडून स्वागत, तर काहींकडून नाराजी व्यक्त होताना दिसत होती. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर सिन्नर तालुक्यातील १२ गावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकीचा रणसंग्राम पहायला मिळणार आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू झाली आहे. यात नांदूरशिंगोटे गावाचा समावेश आहे. गत महिन्यात शेवटच्या सप्ताहास येथे प्रभाग रचना व आरक्षण काढण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी पहायला मिळणार आहे.प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणीस सुरुवात केली होती. सर्वसाधारण सरपंचपद असल्याने सर्व इच्छुक उमेदवार सदस्य होण्यासाठी कुरघोडी करत आहेत. परंतु राज्य शासनाने थेट जनतेतून सरपंचपद निवडून देण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे मनसुबे उधळले आहेत.अनेक इच्छुक उमेदवारांची निराशा झाल्याने सध्या तरी गावात थोडी खुशी, थोडा गम अशी परिस्थिती आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी ग्रामविकास पॅनलला धूळ चारत परिवर्तन पॅनलने सत्ता स्थापन केली होती. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर येथे लोकसभा, विधानसभा, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, जिल्हा बॅँक, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था, विकास संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशी पाचही वर्षे निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे पाच वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात फेरबदल होऊन नवीन राजकीय समीकरणे होऊन गट उदयास आले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना पक्षाचे दोन्हीही उमेदवार विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सद्यस्थितीत गावात व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक विनायक शेळके, बाजार समितीचे संचालक लक्ष्मण शेळके, माजी सरपंच दामोधर गर्जे, विकास संस्थेचे अध्यक्ष संजय शेळके, माजी उपसरपंच मारुती शेळके व शिवराम सानप यांच्या गटाची ग्रामपंचायत व विकास संस्थेवर सत्ता आहे, तर विरोधी गटात व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक आनंद शेळके, माजी सरपंच पी.डी. सानप, माजी सरपंच शंकर शेळके, माजी अध्यक्ष भाऊपाटील शेळके, माजी सरपंच शंकर सानप, पंचायत समिती सदस्य शोभा बर्के यांची पती ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के आहेत. सरपंचपद हे सर्वसाधारण व थेट जनतेतून असल्याने दोन्हीही गटाकडून उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होणार आहे. गावात सर्व प्रभागात असणारा परिचय, मितभाषी व सर्वसमावेशक आणि आर्थिक बाजूही लक्षात घेतली जाणार आहे. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ व २० गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. दहा हजाराच्या आस-पास गावाची लोकसंख्या आहे. येथे सर्व प्रकारचे शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. थेट जनतेतून सरपंचपद असल्याने प्रभागातून उभे राहणारे इच्छुक उमेदवारांमध्ये थोड्याफार प्रमाणात अनास्था पसरली आहे. कारण त्यांना सरपंचाऐवजी उपसरपंचपदावर समाधान मानावे लागणार आहे. नव्या निर्णयामुळे सरपंच निवडण्याचे सर्वाधिकार जनतेला मिळणार आहेत. समितीच्या शिफारशीनुसार सरपंचांच्या अधिकारातही वाढ करण्यात आली असून, ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प सरपंच बनवणार आहे. येत्या आॅक्टोबर महिन्यात ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होण्याची शक्यता असल्याने थेट सरपंच पदासंदर्भात परिसराचे लक्ष लागून राहणार आहे.इच्छुकांच्या कोपरा बैठका अन् मतदारांच्या गाठीभेटीगेली १५ वर्षं येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला या प्रवर्गासाठी प्रत्येकी पाच वर्षे राखीव होते. तब्बल १५ वर्षानंतर सन २०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंचपद हे सर्वसाधारण झाले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. येथील ग्रामपंचायतीची विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर २०१७ रोजी संपत असल्याने त्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली होती. २४ जून २०१७ रोजी येथील रेणुका माता सभागृहात प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले होते. सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून येथे १३ ऐवजी १५ सदस्य संख्या झाली आहे. इच्छुकांनी कोपरा बैठका, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात करून आपण कसे योग्य आहोत हे पटवून देणे सुरू केले आहे. सर्वसाधारण-६, इतर मागास प्रवर्ग-४, अनुसूचित जमाती- ३, अनुसूचित जाती- २ अशा प्रकारे ५ प्रभागांतून प्रत्येकी ३ याप्रमाणे १५ सदस्य निवडले जाणार आहेत. १५ पैकी ८ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
सिन्नर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम
By admin | Published: July 06, 2017 12:31 AM