मालेगाव : पंचायत समितीच्या सत्तेच्या चाव्या अपक्ष, राष्ट्रवादीकडेमालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांत भाजपाचे कमळ फुलले, तर सेनेला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. पंचायत समितीत मात्र शिवसेना व भाजपाचे समसमान सहा सहा उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी व अपक्ष असे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत.येथील शिवाजी जिमखान्यात सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रारंभी टपाली मतदानाची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सात गटांची व पंचायत समितीच्या १४ गणांची वेगवेगळ्या २८ टेबलवर मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, सहायक निवडणूक अधिकारी डॉ. सुरेश कोळी, नायब तहसीलदार गिरीश वाखारे, जगदीश निकम आदिंनी मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवले होते. अवघ्या दीड तासात सात गटाचा व १४ गणांचा निकाल जाहीर करण्यात आला. यात निमगाव गटात भाजपाचे जे. डी. हिरे यांनी सेनेचे मातब्बर उमेदवार मधुकर हिरे यांचा धक्कादायकरीत्या पराभव केला. दाभाडी गटात भाजपाच्या संगीता निकम यांनी सेनेच्या विद्या निकम यांचा पराभव केला, तर रावळगाव गटातील भाजपाचे उमेदवार समाधान हिरे यांनी सेनेचे रमेश अहिरे यांचा धक्कादायक पराभव केला. सौंदाणे गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा देसाई यांना भाजपाच्या मनीषा पवार यांनी पराभूत केले. काट्याची टक्कर झालेल्या कळवाडी गटात भाजपाच्या बलवीरकौर गिल यांनी शिवसेनेच्या अंजली कांदे यांना पराभूत केले. झोडगे गटात शिवसेनेचे दादाजी शेजवळ, वडनेर गटात राजेंद्र सोनवणे निवडून आले. झोडगे व वडनेर गटात सेनेच्या उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवारांना धूळ चारली, तर पंचायत समितीत शिवसेना व भाजपाला मतदारांनी समान कौल दिला आहे. शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी सहा, अपक्ष व राष्ट्रवादी प्रत्येकी एक असा धक्कादायक निकाल पंचायत समितीचा लागला आहे. यात सौंदाणे गणातून मनीषा सोनवणे, करंजगव्हाण गणाचे भगवान मालपुरे, चिखलओहोळ गणाच्या सरला शेळके, वडनेर गणाच्या सुरेखा ठाकरे, कळवाडी गणातून शंकर बोरसे, डोंगराळेच्या बकूबाई पवार आदि शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत तर दाभाडी गणातून कमळाबाई मोरे, रावळगाव गणातून बापू पवार, झोडगे गणातून सुवर्णा देसाई, पाटणे गणातून अरुण पाटील, वडेल गणातून नंदलाल शिरोळे, जळगाव निं. गणातून गणेश खैरनार आदि भाजपाचे उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने चंदनपुरी गणावर प्रतिभा सूर्यवंशी यांच्या रूपाने वर्चस्व सिद्ध केले आहे तर निमगाव गणातून अनिल तेजा हे अपक्ष निवडून आले आहेत. विजयी झालेल्या गट व गणातील उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी प्रमाणपत्र बहाल केले. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अंतिम निकाल घोषित करण्यात आला होता. मतमोजणी केंद्राबाहेर ग्रामीण भागातील मतदारांनी गर्दी केल्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिसांनी मतमोजणी केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.कार्यकर्त्यांचा जल्लोषमतमोजणी केंद्राबाहेर संरक्षक जाळ्या लावून ग्रामीण भागातील उमेदवारांच्या समर्थकांना अडविण्यात आले होते. निकाल जाहीर होताच गट व गणातील निकाल कळताच समर्थक गुलाल उधळीत ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा करीत होते.
गटात भाजपा, तर गणात सेना-भाजपाला समान कौल
By admin | Published: February 24, 2017 12:24 AM