पाटोदा : परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका ,बाजरी सोयाबीन ,भुईमुग मुग या पिकांची शेतात पेरणी व लागवड केली आहे. यावर्षी सोयाबीनला मिळत असलेला दर पाहता सोयाबीन पीक लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ही पिके अठरा ते वीस दिवसांची झाली आहेत. गेल्या दहा बारा दिवसांपासून पाटोदा परिसरात पावसानेही उघडीप दिल्याने ह्या पिकांच्या कोळपणीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरु असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.पाटोदा परिसरात या वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी या पावसाच्या ओलीवर घाई करीत खरीप हंगामातील बाजरी, मका सोयाबीन भुईमुग ,या पिकांची शेतात लागवड केली आहे. लागवडीनंतर एक दोन वेळेस पाऊस झाल्याने पिके चांगली आली आहे. गेल्या काही वर्षांपासून मका पिकाच्या लागवडीचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढत आहे तर बाजरी पिकाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.----------------------लष्करी अळीने शेतकरी हवालदिलगेल्या दोन वर्षांपासून मका पिकावर येत असलेल्या लष्करी अळीने शेतकरी वर्ग हवालदिल होत आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्यामुळे यावर्षी शेतकरी वर्गाने मका लागवडीसाठी हात आखडता घेतला असल्याने मका पिक लागवड क्षेत्र कमी झाल्याचे दिसत आहे . पिकावर औषध फवारणीसाठी एकरी दोन ते अडीच हजार रुपये खर्च येत आहे. अनेक शेतकरी हे बैलजोडीच्या सहाय्याने पिकांची कोळपणी करीत आहे.ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही असे शेतकरी एकरी पंधराशे रुपये देऊन कोळपणी करून घेतांना दिसत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कोळपणीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला असून घरखर्चासाठी तसेच शेतीसाठी भांडवल उपलब्ध होत आहे.
मका,सोयाबीन बाजरीच्या क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 3:34 PM