लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अलीकडे कोणत्याही घटना, प्रसंग आणि दिनविशेष असला की त्याविषयी सोशल मीडियावर अनेक पोस्ट येऊन आदळतात. सोशल मीडियावरील संवाद आणि भावना व्यक्त करण्याच्या या प्रकारामुळे कित्येकदा विषयाचे गांभीर्य हरविले जाते आणि चिमटेही काढण्याची संधी घेतली जाते. गुरुपौर्णिमा दिनालाही सोशल मीडियावर असाच अनुभव आला. अनेकांनी आपापल्या गुरूंविषयी मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली, तर काहींच्या विडंबन पोस्टमुळे मनोरंजनही झाले. यामध्ये ‘जी-एस-टी’ ही पोस्ट विशेष लक्षणीय ठरली.गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत व्हॉट््सअॅपवर आपल्या गुरूंबद्दल आणि आयुष्यात ज्यांच्यामुळे मार्ग सुकर झाला त्या ज्ञात-अज्ञात गुरूंबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पोस्ट फिरल्या. या पोस्ट गुरूंचा आदर वाढविणाऱ्या नक्कीच होत्या. मात्र अशाही काही पोस्ट शेअर करण्यात आल्या की, ज्यामुळे गुरूंविषयीच्या संदेशाचे विडंबन करण्यात आल्याने मनोरंजनही झाले. प्रत्यक्ष आपल्या गुरूंविषयी नव्हे तर शब्दांचा खेळ करीत मित्रांना चिमटे काढणाऱ्या पोस्ट आणि मनोरंजन करणारे एसएमएस लक्षवेधी ठरले. आज आई आणि बायको दोघांना वंदन करा कारण आई म्हणते तुला बायको शिकवते तर बायको म्हणते तुला आई शिकवते. ही धमाल पोस्ट अनेकांच्या चेहऱ्यावर अनुभवाचे हसू देऊन गेली. पुरुषाच्या आयुष्यातील शेवटचा गुरु म्हणजे बायको, त्यानंतर त्याला कोणत्याही ज्ञानाची गरज लागत नाही आणि उपयोगही होत नाही ही पोस्टही अनेकांनी माना डोलावून मान्य स्वीकारली. तर दुसरीकडे आई-वडीलांमधील गुरु यांचीही आठवण करून देण्यात आली. आई, आमची सर्वप्रथम गुरु, त्यानंतर आमचे अस्तित्त्व सुरू आयुष्यातील पहिले गुरु माता-पिता, दुसरे गुरु शिक्षक त्यानंतर प्रत्येक व्यक्ती जिने कळत-नकळत जगण्याचा अर्थ शिकविला अशा सामाजिक आणि कौटुंबिक भान राखणाऱ्या संदेशही सुखावणारे होते. मात्र, सर्वाधिक पोस्ट व्हायरल झाल्या त्या विडंबनाच्या. घे रे, काही होत नाही, असे म्हणून प्यायला शिकविणाऱ्या आद्य गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा पी पी काय होत नाही... असा दिलासा देऊन माझे जीवन धन्य करणाऱ्या सर्व गुरुंना माझा प्रणाम अशी पोस्ट मद्यसंस्कृती वाढविणाऱ्या मद्यप्रेमींना चपराक देणारी होती. एकीकडे असे चित्र असले तरी सामाजिक भान राखत अनेकांनी आपल्या गुरूंना वंदन करणारे संदेश सोशल साईटवर टाकले. यामध्ये आयुष्यातील व्यक्ती आणि गुरूप्रती संवेदना व्यक्त करणारे संदेशही होते.
‘जी-एस-टी’ म्हणजे गुरूंवर, श्रद्धा, ठेवा
By admin | Published: July 10, 2017 12:32 AM