लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एक देश, एक कर प्रणाली देशात लागू होऊन चार आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी, या करप्रणालीतील तरतुदींबाबत अद्यापही व्यापारी, उद्योजकांमध्ये संभ्रम कायम असल्याची बाब जिल्हा उद्योग समितीच्या बैठकीत स्पष्ट झाली. अनेक उद्योजकांनी जीएसटीबाबत प्रश्न उपस्थित केल्याने त्यावर स्पष्टीकरण देणे शक्य नसल्याचे पाहून लवकरच उद्योजकांसाठी जीएसटीबाबत प्रबोधन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी संबंधितांना दिल्या.जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीची विषय पत्रिका उद्योजकांना वेळेवर देण्यात आल्याने व त्यातही अनेक चुका असल्याचे उद्योजकांनी निदर्शनास आणून दिल्याने जुन्याच विषयांवर चर्चेचा घोळ घालण्यात आला. यात प्रामुख्याने दिंडोरी औद्योगिक वसाहतीत संपादन करण्यात आलेल्या २०० हेक्टर भुखंडावर अद्यापपर्यंत एकही उद्योग सुरू होऊ शकला नसल्याची बाब चर्चिली गेली. या ठिकाणी उद्योजकांना देण्यासाठी कोणत्याही सुविधा नसल्याने उद्योजक कसे जातील, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. औद्योगिक वसाहतीपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत, पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर उद्योजकांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या तसेच जोड रस्ते तयार करण्यासाठी लागणाºया भूसंपादनाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सातपूर औद्योेगिक वसाहतीतील मोकळ्या भुखंडावर सुशोभिकरण करण्यासाठी उद्योजकांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.या बैठकीत औद्योगिक वसाहतीतील रस्ते, सांडपाण्याची सुविधा, पथदीपांची दुरुस्ती, मालेगाव तालुक्यातील सायने येथील औद्योगिक वसाहतीतील सुविधा, औद्योगिक वसाहतीतील कचºयाचा प्रश्न आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
उद्योजकांमध्ये जीएसटीबाबत संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 5:10 PM