कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना संभाव्य धोका लक्षात घेता करावयाच्या उपाययोजनांबाबत शुक्रवारी इंडियन ॲकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स संघटनेच्या डॉक्टरांनी नाशिक येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना विविध मागण्यांचे निवेदनही दिले. या निवेदनात लहान मुलांमध्ये डेक्सामेथासोन, इमुनोग्लोबुलीन, पॅरॅसिटॅमोल यासह लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावीत, लहान मुलांना एको कार्डीयोग्राफी ही तपासणी करणारे तज्ञ उपलब्ध असावे यासह विविध मागण्या त्यांनी केल्या आहे. यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, बालरोग तज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये बालरोग तज्ञांनी प्रशासनाला सहकार्य करून या तिसऱ्या लाटेत आपली महत्वपूर्ण अशी भूमिका पार पाडावी असे आवाहन करत डॉक्टरांच्या मागण्यांचा सकारत्मक विचार करून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ.राजेंद्र कुलकर्णी,डॉ.रविंद्र सोनवणे, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ.प्रशांत कुटे, डॉ.रिना राठी, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.वैभव पुस्तके, डॉ.केदार मालवतकर, डॉ.सुशील पारख, डॉ.अमोल मुरकुटे, डॉ.गौरव नेरकर, डॉ.योगेश गोसावी, डॉ.संदीप वासनकर, डॉ.शाम हिरे, आकाश पगार, संदीप अहिरे आदी उपस्थित होते.