लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. देशाची लोकशाही व्यवस्था सुदृढ व बळकट करायची असेल तर प्रत्येक नागरिकाने मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्याबरोबर प्रत्येकाने मित्रांना, नातेवाइकांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी जागृती केली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी केले.
मराठी नववर्षादिनानिमित्त जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘गुढीपाडवा, मतदान वाढवा’ हा उपक्रम राबविण्यात आला. येथील गोल्फ क्लब मैदानावरून सकाळी सात वाजता या उपक्रमाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद, महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षक, कर्मचारी, अधिकारी, विविध सामाजिक व सेवाभावी संस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले व आभार मानले. त्याचसोबत आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर म्हणाले, जनजागृती करताना कोणत्याही राजकीय विचारधारेचा पुरस्कार केला जाणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी ‘कुठलाही मतदार वंचित राहू नये’ अशी संकल्पना घेऊन भारत निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.गोल्फ क्लब मैदानापासून निघालेली ही रॅली त्र्यंबक नाका, जिल्हा परिषदमार्गे शालिमार चौक, सांगली बॅँक सिग्नल, महात्मा गांधीरोड, मेहेर चौकातून मध्यवर्ती बसस्थानक व तेथून पुन्हा त्र्यंबक नाकामार्गे गोल्फ क्लब मैदानावर समारोप करण्यात आला. या रॅलीत तहसीलदार प्रशांत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिक्षणाधिकारी माध्यमिक नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. वैशाली झनकर,मनपा अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ पडोळ मनपा उपायुक्त महेश बच्छाव, आदी उपस्थित होते.