नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, पुढील आठवड्यात मंगळवारी (दि.१३) गुढीपाडवा असल्याने सलग दुसऱ्या वर्षी नाशिकच्या बाजारपेठेत ग्राहक आणि व्यावसायिकांचाही मुहूर्त चूकणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साेने खरेदीला नाशिककरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे अनेक जण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करतात, तर काही जण नवीन उद्योग-व्यावसाय सुरू करतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत कडक निर्बंध असल्याने सराफ व वाहन व्यावसायिकांसह अन्य व्यावसायिकांनाही मोठा फटका बसणार आहे.
शासनाने बाजारपेठेत लागू केलेल्या निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद राहणार असल्याने या मुहूर्तावर बुक झालेल्या तसेच लग्नसराईकरिता घेतलेल्या दागिन्यांच्या ऑर्डर्स कशा पूर्ण करायच्या या विवंचनेत व्यावसायिक आहेत. शहरात या व्यवसायावर किमान पाच ते सात हजार बंगाली कारागीर उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आता त्यांना सराफ बाजारात काम करता येणार का? याचीही चिंता सतावत आहे. गतवर्षीही काेराेनामुळे गुढीपाडवा आणि अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त हुकल्याने सराफी व्यावसायिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. हीच परिस्थिती वाहन विक्रेत्यांचीही आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये सुमारे सातशे ते साडेसातशे चारचाकी, तर दीड हजारहून अधिक दुचाकी वाहनांची विक्री होते. मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही या व्यवसायाला फटका बसणार आहे. खास गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी वाहने बुक करणाऱ्या ग्राहकांनाही वेळेत डिलिव्हरी देऊ शकणार की नाही या विषयी व्यावसायिकांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत.
इन्फो-
विश्वासात न घेतल्याने नाराजी
अनलॉकनंतर काहीकाळ या व्यावसायिकांनी सुरळीत व काेराेना नियमावलीचे काटेकोर पालन करून व्यवसाय सुरू ठेवला. नाशिकमध्ये तर सराफ व्यावसायिकांनी ‘आपले दुकान, आपली जबाबदारी’ अशी मोहीम सुरू करीत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करीत व्यवसाय सुरू ठेवला होता. मात्र, तरीही व्यावसायिकांच्या संघटनांना विश्वासात न घेता अशाप्रकारे कडक निर्बंध लावण्यात आल्याने नाराजीची भावना व्यावसाायिकांत पहायला मिळत आहे.
कोट-१
विवाह सोहळ्याच्या आणि गुढीपडव्याच्या मुहूर्ताच्या ऑर्डर्स पूर्ण करण्याला वेळ मिळणे अपेक्षित होते. परंतु, व्यावसायिकांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे बँकांचे व्यवहार, मालाची व्यवस्था याचा मोठा प्रश्न व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे. किमान गुढीपाडव्याच्या घेतलेल्या ऑर्डर ग्राहकांना पूर्ण करून डिलिव्हरी देण्यासाठी वेळ मिळणे आवश्यक होते.
- गिरीश नवसे अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन.
कोट- २
नाशिक शहरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जवळपास हजार ते दीड हजार दुचाकी वाहनांची विक्री होते. परंतु सलग दोन वर्षांपासून चैत्र महिन्यात व्यावसाय होऊ शकलेला नाही. त्यामुळे वाहन बाजाराला मोठा फटका बसला आहे, भारतीय संस्कृतीत मुहूर्त साधून वाहन खरेदीची परंपरा आहे. मात्र , दोन वर्षांपासून गुढीपाडव्याचा मुहूर्त चुकत असल्याने वाहन बाजाराला मोठा फटका बसला आहे,
प्रकाश खैरनार, वाहन विक्री व्यवस्थापक