नाशिक : विविध रंगी फुले, फळ झाडे आणि वृक्षांच्या नाना छटा दाखवणाऱ्या निसर्ग रचना बघून नाशिककरांचे अक्षरश: भान हरपून गेले. निमित्त होते, ते महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे! शनिवारच्या सुटीची संधी साधून नागरिकांनी या महोत्सवासाठी गर्दी केली आणि वनराई डोळ्यात साठवली.नागरिकांना निसर्गाचे महत्त्व कळावे तसेच शहरात हिरवळ वाढावी यासाठी महापालिकेच्या वतीने पुष्पोत्सव हे स्पर्धात्मक पुष्पप्रदर्शन आयोजित करण्यात येते. मात्र नागरिकांना हवाहवासा वाटणारा हा पर्यावरण महोत्सव मध्यंतरी महापालिकेने बंद केला होता. आठ वर्षांच्या खंडानंतर महापालिकेच्या वतीने पुष्पोत्सवाला प्रथम प्रारंभ झाला आणि त्याला अपेक्षित प्रतिसाददेखील मिळाला. गुलाबपुष्पे, मोसमी व हंगामी फुले, फळे भाजीपाला, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्यांची रचना, पुष्परचना यांसारख्या विविध स्तरावर गुलाब, शेवंतीसह सुवासिक फुलांबरोबरच शोभेची झाडेदेखील आकर्षण ठरली. कुंडीत लावण्याची झाडे तसेच बोन्साय या प्रकारांची माहिती नागरिकांनी घेतली. त्याचप्रमाणे पुष्प रांगोळी आणि पुष्प रचनेची गुजेही महिलावर्गानी जाणून घेतली, परंतु सर्व प्रकारच्या फुलांची छायाचित्रेही मोबाइलमध्ये टिपली तसेच फुलांबरोबर पुष्पमनोरा आणि सेल्फी पॉइंटवरदेखील फुलांबरोबर छबी टिपण्यासाठी गर्दी झाली होती.नमिता कोहोक यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरणशनिवारी (दि. २३) ‘फुलांची सजावट’ या विषयावर फुले सजावट अवधूत देशपांडे यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यातूनही अनेकांनी माहिती जाणून घेतली. रात्री उशिरापर्यंत गर्दीमुळे राजीव गांधी भवन गजबजून गेले होते. रविवारी (दि. २४) या महोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. समारोप सोहळ्यात पुष्पोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना सौंदर्य पुरस्कार विजेती नमिता कोहोक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.
पाहुनी तुजला हरपून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:48 AM