निफाड : दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने २०२१ हे वर्ष सद्गुरू मोरे दादा यांची जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असून, या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी निफाड तालुक्यातील स्वामी समर्थ केंद्राच्या प्रतिनिधींची बैठक निफाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रात घेण्यात आली.बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णासाहेब मोरे उपस्थित होते. यावेळी मोरे यांनी सांगितले की, सद्गुरू मोरे दादा जन्मशताब्दीनिमित्त दि. २१ ते २८ जानेवारीदरम्यान राज्यात कृषिसप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या दरम्यान सेवेकऱ्यांनी विषमुक्त सेंद्रिय शेतीबाबत, ग्रामअभियानाबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, तसेच सेवामार्गाच्या कार्याचा प्रचार, प्रसार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचलन सुभाष खाटेकर यांनी केले, तर निफाड येथील स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख वि.दा. व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी अण्णासाहेब मोरे यांचा सत्कार ॲड. जगदीश बागडे, सस्कर, सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बंडू महाले, हरिभाऊ बनकर, शंकर ढेपले, यशवंत शिंदे, आदींसह निफाड तालुक्यातील सेवा केंद्राचे प्रतिनिधी व सेवेकरी उपस्थित होते.