त्र्यंबकेश्वर तालुक्यात देवगावसह टाकेहर्ष, डहाळेवाडी, टाकेदेवगाव, आव्हाटे, येल्याचीमेट आणि वावीहर्ष या गावांमध्ये तलाठ्यांकडून ई -पीक पाहणी ॲपचे मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲपचा वापर करावा असे आवाहन तलाठी अर्चना नाडेकर यांनी केले. ई- पीक ॲपचा वापर सुलभ होण्यासाठी प्रत्येक गावाचा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून ॲप वापराबद्दल माहिती पुरविली जात आहे. गावातील तरुणांच्या माध्यमातून ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना वापरण्यास सुलभ होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पूर्वी दोन-तीन गावांसाठी एकच तलाठी असल्याने वेळेवर पीक पाहणी करून नोंदवली जात नव्हती. वेळेवर नोंदणी न झाल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुलभ व पारदर्शकता येण्यासाठी शासनाकडून हे ॲप विकसित केले आहे. शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीककर्जही दिले जाते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल. खातेदारनिहाय पीक पाहणीमुळे खातेदारनिहाय पीककर्ज अथवा पीकविमा योजना भरणे किंवा पीक नुकसानभरपाई अदा करणे शक्य होणार आहे. तसेच पीकनिहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे. यासोबतच या ॲपद्वारे खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होऊ शकणार आहे.
ग्रामीण, आदिवासी भागात ई-पीक पाहणी ॲप फायदेशीर ठरेल का? शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकाची नोंदणी स्वतःच करता येण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी हे मोबाइल ॲप तयार केले आहे; परंतु ग्रामीण, आदिवासी भागात या ॲपचा किती वापर शेतकऱ्यांकडून होईल हे सांगणे अवघड आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित शेतकरी, मोबाइल वापरासंबंधी अपुरे ज्ञान, नेटवर्कची समस्या अशा कारणांमुळे ई-पीक पाहणी किती सुलभ होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृषी विभागाचा ई-पीक पाहणी कार्यक्रमावर बहिष्कार?
ई - पीक पाहणी सातबाऱ्यावर येत असल्याने व सातबारा महसूल विभागाशी संबंधित असल्याने कृषी विभागाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणावर कामाचा व्याप असल्यामुळे राज्यातील कृषी विभागाकडून ई-पीक पाहणी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असल्याचे कृषी सहाय्यक जयनाथ गावीत यांनी सांगितले.
ई- पीक पाहणी ॲपचे फायदे...
१) शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकांची नोंदणी स्वतःच करता येणार. २) सुलभता आणि पारदर्शकता ३) पीक पाहणी दावे निकाली काढण्याची सुलभ प्रक्रिया ४) नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अचूक मदत व भरपाई मिळेल.
५) पीक पाहणीमुळे अचूक क्षेत्र कळणार असून, बिगरबागायती क्षेत्रावर मिळणाऱ्या भरपाईला आळा बसेल.