नाशिक : दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दहावीनंतरच्या तंत्रनिकेतन प्रवेश, नियम व प्रतिक्रिया आणि दहावीनंतच्या तंत्रशिक्षणाच्या संधी या विषयी कर्मवीर काकासाहेब वाघ तंत्रनिकेतनतर्फे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे या वर्षापासून प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर परशुराम साईखेडकर नाट्यगृहात महाविद्यालातील विविध शाखांच्या प्राध्यापकांनी त्यांच्या शाखांसदर्भात माहिती दिली. चालू वर्षात विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता आल्याने ऐनवेळी प्रवेशासाठी करावी लागणारी धावपळ कमी झाली असून, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या सोयीसुविधा आणि सवलती याविषयीही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. मनोज झाडे यांनी तंत्रशिक्षणाच्या आयटी, कॉम्प्युटर व इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग या क्षेत्राविषयी, प्रा. प्रविण भंडारी यांनी केमिकल इंजिनियरिंगविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. विद्या खपली यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. प्रा. एच. एम. गायकवाड यांनी प्रवेशप्रक्रियेची नियमावली, आवश्यक कागदपत्रे, आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. तर प्राचार्य प्रकाश कडवे यांनी प्रास्ताविक करताना कर्मवीर काकासाहेब वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वाटचालीविषयी उपस्थिताना माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. पी. पी. वाणी व प्रा. डी. डी. पवार यांनी केली, तर प्रा. सी. जी. उपासणी यांनी आभार मानले.
दहावीनंतर तंत्रशिक्षणाच्या संधीविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:22 PM