सटाणा : दहावी व बारावीच्या सुरू असलेल्या शालांत परीक्षेत कॉपीला आळा घालण्यासाठी प्रभारी तहसीलदार विनय गौडा यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत सोमवारी लखमापूर व नामपूर केंद्रांमध्ये पुस्तके व गाइड आढळून आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरु द्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कॉपीबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी विनय गौडा सध्या बागलाणचे प्रभारी तहसीलदार आहेत. त्यांनी वाळूमाफिया, स्टोन क्रशर, वीटभट्टी व्यावसायिक, रेशनमाफिया यांचे चांगलेच धाबे दणाणले असून, बहुतांश माफिया भूमिगत झाल्याची चर्चा आहे. त्यांनी अवैध धंदा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच कॉपीमुक्त बागलाण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी गौडा यांनी भरारी पथकात सटाणा, कपालेश्वर, लखमापूर, नामपूर, ताहाराबाद येथील परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी दिल्या. बारावी गणिताचा पेपर सुरू असताना लखमापूर व नामपूर येथील परीक्षा केंद्रांवर पुस्तके व गाइड आढळून आले. या प्रकाराबाबत गौडा यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अज्ञात व्यक्तींविरु द्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंडळ अधिकारी पोपटराव गोसावी यांनी फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, बागलाण तालुक्यात कॉपीचे मोठ्या प्रमाणात लोन पसरले असून, केंद्रप्रमुख, सुपरवायझर यांना जबाबदार धरून त्या संदर्भातील अहवाल पुणे बोर्डाकडे पाठविण्याच्या सूचना गौडा यांनी दिल्या. यामुळे केंद्रप्रमुखांचेही धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)
परीक्षा केंद्रावर आढळले ‘गाइड’
By admin | Published: March 07, 2017 11:21 PM