किरण अग्रवाल
ज्या खांद्यावर मान ठेवून अनेक लढाया निर्धास्तपणे लढत आलो, झुंजत आलो, तो खांदाच निखळला म्हटल्यावर अश्रूंचे स्तब्ध होणे स्वाभाविकच आहे. अर्थात अशा स्तब्धतेतही बातमी शोधायची शिकवण ज्यांनी दिली त्या मार्गदर्शकालाच शब्दांजली अर्पण करायची वेळ येणे हा तसा दैवदुर्विलासच, पण तो ओढवला आहे खरा.पत्रकारिता आज अनेकार्थाने बदलली व विस्तारलीही आहे. परिणामी काळाच्या आव्हानांचा सामना करताना अनेकांकडून अनेक गोष्टी सुटून जाताना दिसून येतात. अशा स्थितीत आपल्या तत्त्वांना वा भूमिकांना चिकटून राहात परखडपणा जोपासायचा तर ते सहज सोपे खचितच नव्हते. पण हेमंतराव त्याला अपवाद होते. संपादक हा त्याच्या लिखाणाने ओळखला जायला हवा, त्यासाठी त्याचा चेहरा वाचकांना परिचयाचा असण्याची गरजच नाही, या विचारांपासून ते तसुभरही ढळले नाहीत. पत्रकारितेसह सर्वच बाबतीत दिसून येणारी त्यांची तटस्थता ही त्यातूनच आलेली होती. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचे कुणी कितीही कौतुक केले तरी त्याने हुरळून जाणे त्यांच्या स्वभावात नव्हते. आपल्याला जे दिसते आहे, मनाला बोचते आहे, ते परखडपणे लिहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. ही तटस्थता व परखडपणा हा त्यांचा स्थायीभाव होता खरा, पण त्यापलीकडे जाऊन त्यांच्याशी माझा स्नेह जुळला होता. त्यामुळे कार्यालयात ते माझे साहेब असले व आम्हा संपूर्ण ‘टीम’चे मार्गदर्शक असले तरी माझ्यासाठी ते एक मित्रही होते. ते १ डिसेंबर २00३ रोजी लोकमतमध्ये रुजू झाले, त्याच दिवशी माझ्या धाकट्या कन्येचा जन्म झाला. त्यामुळे माझे लोकमतमधील वय तुमच्या कन्येइतके आहे याची ते या तारखेस मला दरवर्षी आवर्जून आठवण करून देत. दैनंदिन कामाच्या धबडग्यात होणाऱ्या प्रकृतीकडील दुर्लक्षाबाबत रागावण्यापासून ते पाल्याच्या काळजीपर्यंतचे पालकत्व ते निभावत. अगदी परवा हॉस्पिटलमधून घरी आल्यावर त्यांच्या भेटीला गेलो असताही त्यांनी आपल्या प्रकृतीचे गाऱ्हाणे न गाता निवडणुकांचे दिवस असल्याने मलाच तब्येतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. पण त्यांचीच तब्येत अशी धोका देऊन जाईल, असा पुसटसा संशयदेखील तेव्हा आला नव्हता.पत्रकारितेतील मानदंड असणाऱ्या विद्याधर गोखले, माधवराव गडकरी, अरुण टिकेकर आदिंचे सान्निध्य लाभल्याने आणि वाचन अफाट असल्याने हेमंत कुलकर्णी म्हणजे आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी चालती-बोलती संदर्भ शाळाच होती. केवळ जिल्ह्याच्याच नव्हे; तर एकूणच राज्याच्या सहकार, कृषी, उद्योग, राजकारण आणि साहित्याचे ते पटापट पटच उलगडून दाखवित. बातमीच्या अनुषंगाने एखादा विषय निघाला की ते भूतकाळात हरवायचे आणि बोलता-बोलता सहजगत्या अनेक संदर्भ देऊन जायचे.विशेष म्हणजे, संपादक म्हणून केवळ अग्रलेख न लिहिता अगदी वाचकांचा पत्रव्यवहारही ते तितक्याच समरसतेने लिहीत. संपादक झालो असलो तरी मी मूळ बातमीदार आहे व तोच राहणार हे ते वारंवार सांगत. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात काही अनपेक्षित घडले की, त्यांची बोटे वळवळायची आणि अग्रलेख, वृत्तलेख व नाहीच काही तर अगदी बातमीदेखील प्रसवायचे. पण लिहिल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. बेचैनी हेच खरे पत्रकारितेचे लक्षण असते हे त्यांच्या निमित्ताने आम्हास शिकावयास मिळाले. हेमंतराव त्यांच्या खास ‘तिरकस’ शैलीसाठी व परखड लिखाणासाठी ओळखले जात. लोकमतसाठी त्यांनी लिहिलेल्या जवळपास सर्वच लिखाणाचा पहिला वाचक होण्याचे भाग्य मला लाभले. त्यांनी काही लिहिले की, त्यांचा फोन येई, ‘महोदय, एक फाईल टाकली आहे, जरा ओके करून द्या.’ संपादक असतानाही एका कनिष्ठ सहकाऱ्याला इतके मोठेपण देणारे हेमंतराव दुर्मिळच. अधिकाराच्याच नव्हे तर मित्रत्वाच्या नात्याने असे ‘महोदय’ म्हणून पुकारणारा आवाज आता कायमचा स्तब्ध झाला आहे.